आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसर्‍यासाठी बाजारपेठ सज्ज, खरेदीसाठी उत्साह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नवीन वस्तू, वाहन, सोन्या-चांदीचे दागिने खरेदीचा मुहूर्त म्हणजे दसरा. यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, नवरात्र आणि विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढली असून आवक कमी झाल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी 40 रुपये भाव असलेल्या झेंडूच्या फुलांत 15 रुपयांची वाढ झाली. परतीच्या पावसामुळे बहुतांश फुलांची नासाडी झाली. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी झेंडूची फुले आणखी महागण्याची शक्यता आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाला आबालवृद्धांपासून नवीन कपडे खरेदी, सोने, वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यातच यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच सोन्याच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात घसरण झाल्याने सोन्याच्या बाजारातही मोठी उलाढाल होईल. सोन्याच्या दुकानात नेकलेस, राणीहार, मंगळसूत्र, ब्रेसलेट, मोहनमाळ, अंगठय़ा ही दागिने विक्रीसाठी आली होती. दसर्‍याला वाहन खरेदीही मोठी होणार आहे.

गेली दोन वर्षे दडी मारलेल्या पावसाने यंदा जिल्ह्यात चांगली हजेरी लावली. त्यामुळे यंदा फुलांचे उत्पादन चांगले झाले. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरापूर्वीच फुलांची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला 35 रुपये किलो असलेले झेंडूंच्या फुलांचे दर शनिवारी सायंकाळपर्यंत 55 रुपये किलो होते. रविवारी यात वाढ होईल, असा अंदाज आहे. जिल्हा फुलांचे आगार म्हणून ओळखला जातो. नगरची फुले पुणे, ठाणे, मुंबई, औरंगाबादसह परराज्यात जातात. गेली दोन वर्षे पावसाने जिल्ह्यावर अवकृपा केल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले होते. यंदा मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. परतीच्या पावसानेही चांगलेच पुनरागमन केले. परंतु, परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी फुलांची नासाडी झाली. जिल्ह्यात झेंडू, शेवंती, निशिंगध, गुलाबाचे उत्पादन झाले आहे.

शेवंतीची फुले वीस रुपयांनी महागली
रविवारी (13 ऑक्टोबर) विजयादशमी आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून बाजारात फुलांची आवक वाढली आहे. शनिवारी सायंकाळी झेंडूची फुले 35, 40 व 45 रुपये दराने बाजारपेठेत उपलब्ध होती, तर शेवंतीचे दरही किलोमागे 20 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या आठवड्यात 60 रुपये किलो असलेली शेवंती शनिवारी 80 रुपये किलो होती, तर निशिगंध 80 रुपये किलो होते. रविवारी मात्र झेंडूच्या फुलांचे दर आणखी काही प्रमाणात वाढतील, अशी शक्यता आहे.