आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजिरा-गोजिरा मंगळ दुर्बिणीतून दिसतो देखणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जन्मपत्रिकेतील मंगळ अनेकांना धडकी भरवतो, पण प्रत्यक्षात हा लालसर रंगाचा ग्रह किती देखणा आहे, हे दुर्बिणीतून पाहिल्यानंतर लक्षात येते. शुक्रवारी रात्री नगरमधील हौशी मंडळींनी मंगळ दर्शनाचा आनंद घेतला.
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून येथील व्हर्सटाईल ग्रूपतर्फे शुक्रवारची सायंकाळ नगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर गर्भागिरीच्या डोंगरावर असलेल्या चांदबिबी महालाच्या (सलाबतखान मकबरा) परिसरात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सन 1580 मध्ये लष्कराच्या टेहळणीसाठी बांधण्यात आलेल्या चांदबिबी महालाची माहिती भूषण देशमुख यांनी उपस्थितांना दिली. नंतर डोंगरावर असलेल्या वनखात्याच्या निसर्ग माहिती केंद्रात नगरविषयीच्या डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्या. त्यानंतर सुरू झाला आकाशदर्शनाचा कार्यक्रम. सध्या मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ आला आहे. अनिरुद्ध बोपर्डीकर यांनी मंगळाची माहिती पीपीटीवर देऊन ‘नासा’ने तयार केलेली फिल्म दाखवली. भारताच्या मंगळ यानाचा सचित्र प्रवास, तसेच नासाच्या रोव्हर्सची मंगळ मोहीम पाहताना सर्वजण थक्क झाले. नंतर अमोल सांगळे यांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आकाशातील ग्रह, तार्‍यांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अखेरीस सहा व चार इंची दुर्बिणीतून मंगळ, तसेच गुरू, शनि, तसेच मृग नक्षत्र, व्याध व अगस्तीचे दर्शन घडवण्यात आले. हौशी खगोल निरीक्षक दत्ता देवगावकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत आकाश निरीक्षणाविषयी माहिती दिली.