आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्तंड नागरी पतसंस्थेच्या संचालकांचे जामीन फेटाळले, जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मार्तंड नागरी सहकारी पतसंस्थेतील फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेल्या आठ संचालकांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. संचालक विशाल दिलीप निंबाळकर, विनायक पांडुरंग नन्नवरे, दिलीप बाबुराव निंबाळकर, नीलेश नानासाहेब पाटील, धनंजय शरद तवर, हेमंत दामू घोडे, संदीप दिलीप काटे, विनायक माधव मुसळे अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश सुवर्णा के. केवले यांनी बुधवारी दुपारी हा निर्णय दिला.
नितीन सुभाष कुकडे यांनी मार्तंड नागरी पतसंस्थेने आपली १९ लाख १२ हजार ४४९ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन पतसंस्थेच्या पदाधिकारी संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात अटक होऊ नये, म्हणून आठ आरोपींनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केले होते.
आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. अनिल सरोदे यांनी तीव्र आक्षेप घेतला. आरोपींनी स्वत:च्या पदाचा गैरफायदा घेऊन, कायद्याचे पालन करता गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. हा अपहार मोठ्या रकमेचा असून आरोपींकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या ताब्यात असलेली कागदपत्रे मुद्देमाल जप्त करायचा आहे. त्यामुळे या आरोपींना पोलिस कोठडी मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद अॅड. सरोदे यांनी केला.
सरकारी वकिलांना या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. शिवाजी सांगळे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. मार्तंड नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत. त्यामुळे या आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. जामीन फेटाळल्याने ठेवीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...