आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरला होणार स्वतंत्र महिला, शिशू रुग्णालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राज्य सरकारने आरोग्य संस्था स्थापनेच्या नव्या बृहत आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यात दोन उपजिल्हा रुग्णालये व नव्याने चार प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच 47 आरोग्य उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच नगर शहरासाठी 100 खाटांचे स्वतंत्र महिला व नवजात शिशू रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा काही प्रमाणात सुधारणार आहे.

यापूर्वी लोकसंख्येच्या आधारावर राज्यासाठी आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्यात येत होता. त्यामुळे लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या विभागात आरोग्य संस्थांचे प्रमाण वाढले. त्यामुळे या भागात आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध होऊ शकल्या. मात्र, कमी लोकसंख्येच्या ठिकाणी अल्प प्रमाणात आरोग्य संस्था निर्माण झाल्या. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाताना दिसत होता. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य संस्थांचे बळकटीकरण व सुविधा वाढवण्यासाठी नवा बृहत आराखडा तयार केला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या नव्या बृहत आराखड्यानुसार नगर शहरात 100 खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयांची स्थापना होणार आहे. या माध्यमातून प्रसुतीचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच बाळंतपणासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. राज्यात सध्या 8 स्त्री रुग्णालये कार्यरत असून नव्याने नगरसह 15 जिल्ह्यांच्या ठिकाणी ही रुग्णालये सुरू होणार आहेत. जिल्ह्यात सध्या 96 प्राथमिक आरोग्य केंद्र, 555 उपकेंद्र आहेत. नवीन प्राथमिक आरोग्यकेंद्राला मंजुरी देण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या किमान 30 हजार असावी. तसेच दुसर्‍या आरोग्य केंद्रापासूनचे अंतर 25 किलोमीटरपेक्षा जास्त असावे ही अट सरकारने घातली होती. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षांपासून नव्याने एकाही प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली नाही. मात्र, आरोग्य विभागाने केलेल्या मागणीनुसार आरोग्य केंद्राचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले होते. त्याचाच फायदा होऊन नव्या बृहत आराखड्यात बहुतेक प्रस्तावांना मंजुरी मिळाली.

जिल्ह्यात नव्याने कोळगाव (र्शीगोंदे) व संवत्सर (कोपरगाव) तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामीण रुग्णालय, तर सोनेगाव (जामखेड), जोरवे, खांबा (संगमनेर), पांजरे (अकोले) येथे प्राथमिक आरोग्यकेंद्रे होणार आहेत.

तालुकानिहाय उपकेंद्रे : अकोले 4, संगमनेर 11, नेवासा 5, शेवगाव 1, पाथर्डी 5, राहुरी 6, पारनेर 2, र्शीगोंदा 5, कर्जत 6, जामखेड 4 उपकेंद्र नव्याने मंजूर झाले आहेत. नवे शासकीय रुग्णालये, तसेच सेंटर सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची उपचारासाठी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.