नगर - दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीत एकाच दिवसात मोठी उलथापालथ झाली. शहर विकास आघाडीतील नगरसेवक सुवेंद्र गांधी यांची भाजपच्या गटनेतेपदी शनिवारी निवड करण्यात आली. परंतु गांधी यांची ही निवड बेकायदेशीर आहे. ते खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांचाच व्हिप अधिकृत असल्याचा दावा देखील शिवसेनेने केला आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने देखील दत्ता कावरे हेच भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शहर विकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दोन दिवसांनी होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे समीकरण तयार झाले आहे. त्यात भाजपचे गांधी आगरकर असे दोन गट पडले आहेत. गांधी गटाने महापौरपदासाठी नंदा साठे, तर उपमहापौरपदासाठी श्रीपाद छिंदम यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आगरकर गट मात्र शिवसेनेच्याच बाजूने उभा आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी सुरेखा कदम उपमहापौरपदासाठी दत्ता कावरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, गांधी गटाचे सुवेंद्र यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली असल्याची माहिती शनिवारी समोर आली. गांधी यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना साठे छिंदम यांना मतदान करण्याबाबतचा व्हिप देखील बजावला आहे. परंतु गांधी गटनेतेपदी झालेली ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेने केला अाहे. निवडणूक झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात ३० दिवसांच्या आत गटनोंदणी करावी लागते. एकवेळ झालेली ही गटनोंदणी पुन्हा बदलता येत नाही. गटनोंदणी गटनेता यात बदल करायचा असेल, तर निवडणुकीच्या एक महिना आधी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव द्यावा लागतो. त्यानंतरच हे बदल होतात. गांधी यांनी मात्र केवळ गटनेता बदलण्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र दिलेले आहे. त्यांची गटनेतेपदी निवड झालेली नाही. त्यामुळे गांधी यांनी बजावलेला व्हिप बेकायदेशीर अाहे. दत्ता कावरे यांचा व्हिप अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. दरम्यान, विभागीय अायुक्त कार्यालयाने देखील भाजपचे गटनेते दत्ता कावरे हेच असल्याचे स्पष्टीकरण "दिव्य मराठी'शी बोलताना दिले.
गांधी यांनी केवळ गटनेता बदलण्यासाठी पत्र दिले असल्याचेही या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कावरे यांचा व्हिप भाजपच्या सर्व नगरसेवकांना लागू होणार आहे. तसे झाल्यास भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शहर विकास आघाडीसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे.
आघाडीतील बंडखोर
> बाळासाहेब बोराटे
> संजय लोंढे
> मुदस्सर शेख
> जयश्री सोनवणे
> सुनीता भिंगारदिवे
> कलावती शेळके
घरवापसी नाहीच
शिवसेनेच्या कंपूत गेलेले आघाडी मनसेतील बंडखोर घरवापसी करतील, अशी शक्यता होती. परंतु "दिव्य मराठी'ने काही बंडखोरांशी संपर्क साधला असता, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम अाहोत. काही झाले तरी आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी गांधी गटाला त्याचा फारसा फरक पडणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे.