आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडणूक : काँग्रेस आघाडीची धाव 'व्हिप'­ पर्यंतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चितपट करण्याचे शिवसेनेचे मनसुबे खरे ठरणार आहेत. महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली, तरी आघाडीचे नेते ताेंडातून 'ब्र' काढण्यास तयार नाहीत. बंडखोरांना धाक दाखवण्यासाठी त्यांनी केवळ व्हिप बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक, तर शहरात फिरकायलाही तयार नाहीत. यावरूनच या निवडणुकीतील आघाडीची धाव आता केवळ व्हिप बजावण्यापुरतीच उरली असल्याचे स्पष्ट होते.

महापौर-उपमहापौर निवडणूक २१ जूनला सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेतर्फे महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम यांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतला. निवडणूक पाच दिवसांवर येऊन ठेपली, तरी आघाडीमध्ये कोणत्याच हालचाली नाहीत. काँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली, एवढीच काय ती आघाडीतील हालचाल. परंतु ही हालचाल महापौर निवडणुकीसाठी नसून ती केवळ बंडखोरांना व्हिप बजावण्यासाठीच असल्याचे काँग्रेसच्याच एका सक्रिय कार्यकर्त्याने 'दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले.

शहरच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. असे असताना आघाडीचे पक्ष निरीक्षक शहरात फिरकायलाही तयार नाहीत. राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीसाठी मात्र त्यांनी स्थानिक पातळीवर साधी बैठकही घेतलेली नाही. काँग्रेसने या निवडणुकीसाठी रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. परंतु चौधरी हे अद्याप शहरात फिरकले नाहीत. त्यामुळे आघाडीला ही निवडणूक लढवायची नसल्याचा संदेश शहरात गेला आहे.

एरवी प्रत्येक महापौर निवडणुकीत विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे आघाडीचे दिग्गज नेतेही या निवडणुकीबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच ही निवडणूक फिक्स तर नाही ना, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू होती. आघाडीच्या सध्याच्या हालचाली पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक अाता केवळ बंडखोरांना व्हिप बजावण्यापुरतीच उरली असल्याचे चित्र आहे.

कोतकर विखे यांच्या भेटीला
काँग्रेसगटनेतेपदी सुवर्णा कोतकर यांची निवड केली. संदीप कोतकरांसह सात नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे बुधवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे सर्व नगरसेवक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भेटीला गेले होते. परंतु विखे यांच्याकडूनही आदेश मिळालेे नाहीत. गटनेतेपदाची हालचाल ही केवळ व्हिप पुरतीच मर्यादित असल्याचे काँग्रेसच्या एका सक्रिय कार्यकत्याने 'दिव्य मराठी'शी बोलताना स्पष्ट केले.

महापालिकेवर भगवाच...
शिवसेनेनेआघाडी, मनसे, अपक्ष, तसेच भाजपचे काही नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. काँग्रेसच्या गटनेतेपदी सुवर्णा कोतकर यांची निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर 'दिव्य मराठी'ने सेनेच्या काही नगरसेवकांशी फोनवरून संपर्क साधला असता महापालिकेवर भगवाच फडकणार असल्याचा दावा त्यांनी केला. एका नगरसेवकाने, तर आमच्या बरोबर कोण- कोण आहेत, ही नावेच धडाधडा सांगितली. शिवसेना नगरसेवकांचा हा आत्मविश्वास पाहता, आघाडीने ही निवडणूक सोडून दिली असल्याचे स्पष्ट होते.

कदम आज अर्ज भरणार
शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम यांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेतला, त्या गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून उपमहापौरपदाच्या उमेदवारीबाबत गुरुवारीच नाव निश्चितीची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून कोण अर्ज घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.