आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडणूक: विखेंचा दुटप्पीपणा; निवडणुकीत पुन्हा चुरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे म्हणणारे विधानसभेतील विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी एकाच दिवसात आपली भूमिका बदलली. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्याबरोबर झालेल्या गुप्त बैठकीत त्यांनी भाजपच्या गांधी गटाबरोबर राहण्याचा निर्णय सोमवारी घेतला. विखे यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे महापौरपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत जुळले असले, तरी प्रत्यक्षात सभागृहात उपस्थित राहणारे नगरसेवकच महापौरपदाच्या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. दरम्यान, नगर महापालिकेत निर्माण झालेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन राजकीय समीकरणाचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत. शिवसेना-भाजप युतीला त्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या गांधी गटाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत महापौर-उपमहापौरपदावर दावा केला आहे. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. निवडणूक निर्णयअधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गांधी गटाने राज्यातील सत्तेचा वापर करत ऐनवेळी भाजपच्या गटनेतेपदी सुवेंद्र गांधी यांची निवड करण्याची खेळी यशस्वी केली. विभागीय आयुक्तांनी सुवेंद्र गांधी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. विभागीय आयुक्तांच्या या पत्राबाबत मनपाच्या नगरसचिवांनी कायदेशीर मार्गदर्शनही मागवले आहे. मनपाचे विधिज्ञ प्रसन्ना जोशी यांनी सुवेंद्र गांधी यांची गटनेतेपदी झालेली निवड योग्य असल्याचा अहवाल दिला आहे.

काँग्रेसच्या गटनेत्या सुवर्णा कोतकर यांच्याबाबतीतही हाच नियम लागू झाल्याने भाजपचे पूर्वीचे गटनेते सध्या शिवसेनेच्या बाजूने असलेले दत्ता कावरे यांच्या गटनेतेपदाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. कावरे हेच भाजपचे गटनेता असल्याचा दावा शिवसेना करत आहे. दरम्यान, गटनेतेपदाचा हा घोळ सुरू असतानाच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जातीयवादी पक्षाबरोबर कदापि जाणार नसल्याचा दावा रविवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला होता. परंतु त्यांनी सोमवारी घुमजाव करत गांधी गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्याबरोबर दुपारी झालेल्या बैठकीत विखे यांनी गांधी गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या गटनेत्या सुवर्णा कोतकर यांनी गांधी गटाच्या महापौरपदाच्या नंदा साठे यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला. विखे यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे महापौर निवडणुकीत पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे.

निवडणुकीचे पडसाद राज्यभर उमटणार
राज्यातीलनागपूर वगळता एकाही महापालिकेत भाजपचा महापौर नाही. जेथे भाजप-शिवसेनेची युती आहे, तेथील महापालिकेत भाजपला उपमहापौरपद देण्यात आले आहे. नगर महापालिकेत मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महानगर विकास आघाडीचा म्हणजेच भाजपचा महापौर झाला, तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील. या अभद्र महाआघाडीमुळे शिवसेना भाजपशी काडीमोड घेण्यासदेखील मागेपुढे पाहणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटणार आहेत.

कायदेशीर लढाई जुंपणार
भाजपचेपूर्वीचे गटनेते दत्ता कावरे नवीन गटनेते सुवेंद्र गांधी यांचा गटनेतापदाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. दोघांनीही आपलाच व्हिप अधिकृत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीनंतर दोघांनाही कायदेशीर लढ्याला तोंड द्यावे लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेदेखील आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचा महापौरपदासाठी उमेदवार नसल्याने त्यांचा हा व्हिप त्यांचेच नगरसेवक मान्य करतील की नाही, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित असलेले नगरसेवकच महापौरपदाचे भवितव्य ठरवणार आहेत.

काँग्रेसबाबत संभ्रम
शासकीयविश्रामगृहात विखे यांनी सोमवारी बैठक घेतली. काँग्रेसचे निरीक्षक शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर चौधरी यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. दरम्यान, गटनेत्या सुवर्णा कोतकर यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना गांधी गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा साठे यांना मतदान करण्याबाबतचा व्हिप बजावला. मात्र, रात्री उशिरा चौधरी यांनी पक्ष तटस्थ भूमिका घेणार असून तसे पत्र कोतकर यांना दिले असल्याचे "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...