आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर महापौर जगताप यांचा "राजी'नामा, वैयक्तिक कारण केले पुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी अखेर बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. व्यक्तिगत कारणांमुळे महापौर म्हणून काम करणे शक्य नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले असले, तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच हा राजीनामा देण्यात आला. जगताप यांनी राजीनामा देताच शिवसेना-भाजप युती महापौरपदाच्या तयारीला लागले आहेत.
महापौरपदाचा उमेद्वार ठरवण्यासाठी सेनेची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. दरम्यान, ज्यांच्यासाठी राजीनामा देण्यात आला, त्या अभिषेक कळमकर यांचे नाव मात्र महापौरपदासाठी जाहीर करण्याचे जगताप यांनी टाळले. महापौरपदाचा उमेदवार पक्षश्रेष्ठीच ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार जगताप महापौरपदाचा राजीनामा देणार, अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. अखेर राजीनाम्याचा दिवस बुधवारी उजाडला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जगताप यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याचे आठ दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. मात्र, जगताप यांनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे ते खरेच राजीनामा देणार का, याबाबत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकही अनभिज्ञ होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी जगताप यांच्या राजीनाम्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. पुतणे अभिषेक कळमकर यांना महापौरपदी बसवण्याचा शब्द दादांनी विधानसभा निवडणुकीतच जगताप यांच्याकडून घेतला होता. परंतु जगताप यांनी हो- नाही करत राजीनाम्याचा विषय लांबणीवर टाकला होता. पक्षश्रेष्ठींकडून आदेश येताच पदाचा राजीनामा देऊ, असेही जगताप वारंवार सांगत होते. अखेर राजीनामा देण्याबाबत त्यांना पक्षश्रेष्ठींकडून आदेश मिळाले, परंतु राजीनामा पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने नव्हे, तर वैयक्तिक कारणांमुळे दिल्याचे जगताप यांनी सांगितले. अभिषेक कळमकर यांना महापौरपदी बसवण्यासाठी राजीनामा द्यावा लागला असला, तरी जगताप यांनी कळमकर यांचे नाव महापौरपदासाठी जाहीर करण्याचे टाळले. महापौरपदाचा उमेदवार पक्षश्रेष्ठीच ठरवणार असल्याचे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, जगताप यांनी राजीनामा देताच शिवसेना-भाजप पुढील तयारीला लागले आहेत. महापौरपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. महापौरपदाचा उमेदवार निश्चित होताच अपेक्षित संख्याबळाची जमवाजमव करण्यासाठी सेना-भाजप प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आघाडीचा महापौरपदाचा मार्ग कठीण होणार आहे. कळमकर यांचे नाव निश्चित झाल्यास त्यांना महापौरपदाच्या खुर्चीवर बसवण्याची जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावरच आहे. त्यामुळे पूर्वीचे मनपातील संख्याबळ कायम ठेवण्यासाठी जगताप यांना पुन्हा एकदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कोण आहेत महापौरपदाचे दावेदार...
बातम्या आणखी आहेत...