आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor Sangram Jagatap,Latest News In Divya Marathi

एलबीटी रद्द करा, पण दरवर्षी भरीव अनुदान द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करा, परंतु त्याबदल्यात महापालिकेला दरवर्षी भरीव अनुदान द्या, अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंगळवारी केली. एलबीटी बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईत राज्यभरातील महापालिकांचे महापौर व आयुक्तांची बैठक झाली. त्यावेळी जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
एलबीटी रद्द करा, अशी राज्यभरातील व्यापार्‍यांची अनेक दिवसांची मागणी आहे. त्यासाठी व्यापारी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. परंतु शासनाने प्रत्येक वेळी खोटी आश्वासने दिली. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र संताप आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा आघाडीला मोठा फटका बसेल, अशी भीती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एलबीटी रद्द करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एलबीटीबाबत योग्य निर्णय घ्या, अशी सूचनाही पवार यांनी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत राज्यातील सर्व महापालिकांचे महापौर व आयुक्तांची बैठक घेतली. सायंकाळी सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीत एलबीटीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यभरातील महापौर व आयुक्तांनी एलबीटीबाबतची आपली भुमिका बैठकीत स्पष्ट केली. नगर महापालिकेच्या वतीने महापौर जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी या बैठकीला उपस्थित होते. जगताप यांनी एलबीटी रद्द करण्यास सहमती दाखवली, तसेच एलबीटीच्या बदल्यात महापालिकेला दरवर्षी भरीव स्वरूपात अनुदान मिळावे, असे मत व्यक्त केले.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महापालिकेला निधी मिळतो, परंतु योजनांची अंमलबजावणी करताना महापालिकेला स्वत:चा हिस्सा भरावा लागतो. हा खर्च एलबीटीसारख्या करातूनच वसूल होतो. एलबीटी रद्द झाला, तर महापालिका आर्थिक अडचणीत सापडतील. त्यामुळे शासनाने एलबीटी रद्द करावा, परंतु त्याबदल्यात दरवर्षी भरीव स्वरूपात अनुदान द्यावे, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.