आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor Sangram Jagtap To Support Rajiv Sabale, Divy Amarathi

राजीव राजळे यांच्या प्रचारात महापौर संग्राम जगताप सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- उमेदवारी अर्ज माघारीनंतर नगर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारात महापौर संग्राम जगताप सक्रिय झाले आहेत. कार्यकर्ते व नगरसेवकांसह ते सोमवारी (31 मार्च) सकाळी 8 वाजता ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेऊन शहरातून प्रचार फेरी काढणार आहेत. जगताप यांच्यामागे युवकांची मोठी फौज आहे. त्यामुळे जगताप यांच्या मदतीने राजळे यांना शहरातून मोठे पाठबळ मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपद मिळताच जगताप यांनी शहरातील चौकाचौकात पक्षाच्या शाखा सुरू करून कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यामुळेच त्यांना महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाले. आता ते राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार राजळे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी 8 वाजता राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह प्रचार फेरी काढून ते राजळे यांच्यासाठी मते मागणार आहेत. स्वत: महापौर प्रचारात उतरल्याने राजळे यांना शहरातून पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी हे देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत शेवगाव येथे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे नगर मतदारसंघातील प्रचाराला सोमवारपासून खर्‍या अर्थाने वेग येणार आहे. राजळे व गांधी यांच्यासाठी शहरातील मतदार निर्णयाक ठरणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रचाराकडे दोघांनीही विशेष लक्ष दिले आहे.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष जगताप, तर भाजपची धुरा शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर सांभाळणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रचाराला चांगलीच रंगत येणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी वातावरण चांगले
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगले वातावरण आहे. शहरातील नागरिकांनी महापालिका निवडणुकीत आघाडीच्या बाजूने कौल दिला. आता लोकसभा निवडणुकीतही नागरिक आघाडीलाच साथ देतील. राष्ट्रवादीचे उमेदवार राजळे यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ.’’ संग्राम जगताप, महापौर.