आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical News In Marathi, Government Hospital Bad Situation, Divya Marathi

महापालिकेची आरोग्य केंद्रे ‘कोमा’त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इमारती नसल्याने आरोग्य केंद्रे उरली नावापुरती; इमारतीचे प्रस्ताव धूळखात पडून

साडेचार लाख लोकसंख्येच्या नगर शहरात रस्ते, पाणी, वीज व आरोग्य या अत्यावश्यक सेवांची वाट लागली आहे. त्यात आरोग्य सेवेचा प्रश्न अधिक गंभीर आहे. शहराच्या विविध भागांतील महापालिकेची पाच आरोग्य केंद्रे पुरेसे कर्मचारी व इमारतींविना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सात पैकी एकाही केंद्रासाठी प्रशस्त इमारत नाही. काही केंद्रे तर अक्षरश: अडगळीच्या खोलीत सुरू आहेत. कर्मचारी व रुग्णांना बसायला जागा तर नाहीच, शिवाय उपचारासाठी लागणारी साधनसामग्री व औषधेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा प्रश्न आहे. फार्मासिस्ट, क्लर्क व नर्स हे कर्मचारी नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनाच सर्व उठाठेव करावी लागते. त्यामुळे कंटाळलेले काही वैद्यकीय अधिकारी बहुतेक वेळा केंद्रात हजर नसतात. अशा वेळी रुग्णांना त्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते.
केडगाव उपनगरात एकाच खोलीत संपूर्ण केंद्राचे कामकाज चालते. उपचारांसाठी लागणारे टेबल, खुच्र्या, औषधे, लसीकरणाचे साहित्य, निकामी झालेले इतर साहित्य या खोलीत खचाखच भरले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी येतात. गंजबाजारातील दाणे डबरा आरोग्य केंद्रातही अनेक दिवसांपासून रुग्णांची हेळसांड सुरू आहे. औषधे उपलब्ध नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तोफखाना येथील केंद्रात पाठवले जाते. निकामी झालेले लाकडी कपाट, खुच्र्या, फ्रिज, टेबल असे साहित्य गेल्या अनेक दिवसांपासून तेथे अडगळीत पडले आहे. त्यावर धुळीचा थर साचला असून अशाच परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यात येतात. माळीवाड्यातील महात्मा फुले आरोग्य केंद्रातही अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची तपासणी करण्यात येते, तेथे साधे पडदेदेखील नाहीत. त्यामुळे महिला रुग्णांची मोठी कुचंबना होते. झेंडीगेट केंद्रात उपचारासाठी आवश्यक साहित्य नसल्याने तसेच वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांत उपचार घ्यावे लागतात. मुकुंदनगर व नागापूर आरोग्य केंद्रातील सेवा जवळपास ठप्प झाली आहे. मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांनी या आरोग्य केंद्रांचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर गरीब रुग्णांवर खासगी दवाखान्यांत महागडे उपचार घेण्याची वेळ येणार आहे.