आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध विक्रेत्यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील 50 हजार औषध विक्रेते आयुक्तांच्या नियमानुसारच आपले औषध दुकान चालवणार आहेत. मात्र, त्यातून औषध विक्रेत्यांना ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास 18, 19 व 20 जुलैला महाराष्ट्र बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व सचिव अनिल नावंदर यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या आदेशानुसार सक्षम डॉक्टरांच्या सूचनांवरूनच औषधे दिली जाणार आहेत. किरकोळ, घरगुती औषधे खरेदी करणार्‍यांना औषध विक्रेते आता औषधे विकू शकणार नाहीत. ज्यांची औषध व्यवसाय अन्न व औषध प्रशासन कायद्यांतर्गत स्टेट मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदणी झाली आहे, अशा डॉक्टरांनाच रोगनिदान व औषधे लिहून देण्याचा अधिकार आहे. हा नियम अँलोपॅथी औषधांसाठी आहे, तर होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी व तत्सम डॉक्टरांना रुग्णांसाठी औषधे लिहून देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या डॉक्टरांच्या चिठ्ठीवर पुढील काळात औषधे मिळणार नाहीत.
स्टेट मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या नावाची नोंद आहे की नाही, हे तपासण्याचे काम करावे लागणार आहे. शिवाय बोगस डॉक्टरांचीही तपासणी करावी लागणार आहे. ग्रामीण भागात नोंदणीकृत सक्षम डॉक्टर मिळणे अशक्य आहे. मात्र, अशा डॉक्टरांवरच ग्रामीण भागाचे आरोग्य अवलंबून असते. आयुक्तांच्या आदेशान्वये सकाळी 10 ते 6 या वेळेतच औषध दुकान चालवण्यास परवानगी दिली आहे. आयुक्तांचे हे आदेश अन्यायकारक असल्याने या विरोधात बंद पुकारण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.