आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उड्डाणपुलासाठी गुरुवारी होणार मंत्रालयात बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वाहतूक कोंडी, सतत होणारे अपघात, वाहतूक पोलिसांवरील वाढता ताण या सर्व बाबी पाहता स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत प्रस्ताव तयार करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम िवभागाला देण्यात आली आहे. गुरुवारी (५ फेब्रुवारी) मंत्रालयात उड्डाणपुलाबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी दिली.

पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बाह्यवळण रस्ता, जिल्ह्यातील रस्ते, वीज वितरण, वाडिया पार्क, दक्षता समिती व सांडपाणी व्यवस्था या विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार संग्राम जगताप, आमदार विजय औटी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी अशोक खैरे आदी यावेळी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, १३ कोटी २३ लाखांचा प्रस्तावित उड्डाणपूल होता. निविदा, भूसंपादन या प्रक्रिया पार पडल्यानंतर पुलाचे काम घेणा-या संबंधित संस्थेने आणखी ७५ कोटींची मागणी केली. त्यामुळे हे काम रखडले होते. उड्डाणपुलाबाबत सार्वजनिक बांधकामला अद्ययावत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. शहरासाठी उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात किंवा केंद्राकडून काही निधी देता येईल का, याबाबत मंत्रालयात होणा-या बैठकीत चर्चा होईल.

शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाचा वापर नगर शहर व जिल्ह्यातील लोकांना करता येत नाही. हा वाद न्यायालयात गेला आहे. याबाबत महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी येत्या आठ दिवसांत संयुक्त बैठक घेऊन सर्वसंमतीने हा विषय संपवावा, असे सांगितले आहे. स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरातील ९१ स्वस्त धान्य दुकानांत बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार असून, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील. स्वस्त धान्य
दुकाने महिला बचत गटांना देण्याचे आश्वासन पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. अनेकदा जाहिराती देऊनही स्वस्त धान्य दुकाने घेण्यासाठी बचत गट पुढे न आल्याने अन्य संस्थांना दुकाने देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची ५ कोटी ९३ लाखांची विजेची थकबाकी आहे. बिल थकल्यामुळे या योजनांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सर्वांची मागणी होती. प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीजदरात बदल करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे शिंदे म्हणाले.

डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर
अनेक वर्षांपासून नगरचा डेव्हलपमेंट प्लॅन मंत्रालयात पडून होता. भाजपचे सरकार येताच कोणी पाठपुरावा केला नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्लॅन मंजूर केला. सांडपाणी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्याला २०१४ मध्ये केंद्राची मंजुरी मिळाली असून हा प्रकल्प सुरू होईल. मात्र, तत्पूर्वी सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे.''
राम शिंदे, पालकमंत्री.

खासदार गांधींची आगपाखड
बाह्यवळण व उड्डाणपुलाबाबतच्या बैठकीत खासदार गांधींनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम व महापालिका अधिका-यांना धारेवर धरले. वापरत असलेला रस्ता खराब झालेला असताना त्याच संस्थेला दुरुस्तीचे काम दिले, याबाबत नाराजी व्यक्त करून अतिक्रमणांबाबत महापौर संग्राम जगताप यांच्यासमोर त्यांनी शहरातील रस्ते सहापदरी करण्यासाठी सर्व अतिक्रमणे काढावीत, त्यासाठी सर्वांचा विरोध पत्करण्यासाठी मी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.