नगर - नगर येथील जलतरणपटू मेघना कुलकर्णी हिने १९ किलोमीटर अंतर पोहून पार केले. जिल्ह्याच्या इतिहासात विक्रम करणारी ती पहिली युवती ठरली आहे. तिच्या कामगिरीची दखल शासनाने घ्यावी, अशी अपेक्षा प्रशिक्षक गणेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बोहरामपूर तालुक्यातील जीयागंज येथून जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेला १८ सप्टेंबरला सुरुवात झाली. ही स्पर्धा ८१ १९ किलोमीटर अंतरासाठी स्त्री पुरुष गटात झाली. किमान १३ वर्षे पूर्ण असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान किलोमीटर पोहण्याचा अनुभव असलेले प्रमाणपत्र असावे, अशी अट घालण्यात आली होती.
बंगाल राज्य जलतरण संघटना, जिल्हा स्विमिंग असोसिएशन स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा करण्यात आली होती. १९ किलोमिटर अंतरासाठी १५ महिलांची निवड झाली. त्यात महाराष्ट्रातील महिलांचा समावेश होता. पुरुष गटात ६३ स्पर्धक सहभागी झाले होते. ८१ किलोमीटर अंतरासाठी राज्यातील १२ जलतरणपटू सहभागी झाले होते.
१९ किलोमीटर अंतर ठाणे जिल्ह्यातील मयांक चाफेकर याने तास २० मिनिटांत पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावला. हेच अंतर नगरच्या मेघना कुलकर्णी हिने अडीच तासांत पूर्ण केले. तिला अॅड. सतीशचंद्र राक्षे, स्वाती राक्षे, डॉ. अनिरुद्ध गिते, मोहन नातू, चंद्रकांत सल्ला, नितीन भंडारी, मंदार, गजानन चव्हाण, रामदास ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले.
मेघना हिने नगर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जलविहारात पोहण्याचा सराव केला. मुळा जलाशयामुळे लांब पल्ल्याचा सराव करण्यास तिला मोठी मदत झाली. बुधवारी नगर येथे आगमन होताच मेघनाचे विविध संस्था, संघटना व्यक्तींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.