आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहेराबादचे संग्रहालय पाहण्याची उद्या "सिटी वॉक'मध्ये संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-तब्बल ४४ वर्षे मौन पाळणा-या अवतार मेहेरबाबांनी संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण दिली. गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरू करणारे, औषधोपचारांसाठी दवाखाना उघडणारे, कुष्ठरुग्णांना स्वत:च्या हाताने स्नान घालणारे आणि मुक्या जनावरांवरही प्रेम करणारे मेहेरबाबा अनेक वर्षे नगर शहराजवळील अरणगाव परिसरात वास्तव्याला होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांना भेट देण्याची संधी नगरकरांना रविवारी (७ सप्टेंबर) सकाळी "दिव्य मराठी सिटी वॉक'मध्ये मिळणार आहे.
नगरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर नगर-दौंड रस्त्यावर निसर्गरम्य वातावरणात मेहेराबाद वसले आहे. अरणगावजवळच्या छोट्या टेकडीवर अवतार मेहेरबाबांची समाधी आहे. समाधीजवळ मेहेरबाबा राहात असलेली खोली आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. त्यांची सायकल, क्रिकेटचे साहित्य, कपडे अशा अनेक गोष्टी तेथे जपून ठेवण्यात आल्या आहेत. वरच्या मजल्यावर मेहेरबाबांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत. "सिटी वॉक'मध्ये हे अनोखे संग्रहालय पाहता येईल.
मेहेरबाबांचा चरणस्पर्श झालेल्या या परिसरातील विविध महत्त्वाच्या स्थळांची माहिती यावेळी उपस्थितांना घेता येईल. त्यांच्या जीवनावरील माहितीपटही दाखवला जाणार आहे. ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. मेहेरनाथ कलचुरी यावेळी उपस्थित असतील. मेहेरबाबा ट्रस्टच्या वतीने परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई फुलवण्यात आली आहे. विविध प्रकारच्या झाडांमुळे हा परिसर हिरवागार झाला आहे. त्यामुळे निसर्ग भ्रमणाचाही आनंद घेता येईल. हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यावेळी परिसरातील वृक्षांबद्दल माहिती देतील.
भेटू उद्या सकाळी पावणेआठ वाजता...
हा उपक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. रविवारी सकाळी पावणेआठ ते अकरादरम्यान होणाऱ्या सिटी वॉकमध्ये कोणालाही सहभागी होता येईल. पावणेआठ वाजता मेहेराबाद येथील धुनीजवळ एक जमायचे आहे. वाहने तेथे लावून पुढे पायी फिरायचे आहे. येताना पिण्याचे पाणी व छी आणावी. अधिक माहितीसाठी भूषण देशमुख (मोबाइल ९८ ८१ ३३ ७७ ७५) यांच्याशी संपर्क साधावा.