आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Members Bycotted On Social Justice Committee Meeting

समाजकल्याण समितीच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाजकल्याण समितीच्या सभेपूर्वी अजेंडा न पाठवल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत मंगळवारी सभेवर बहिष्कार घातला. सायकल खरेदीचा विषय परस्पर स्थायीसमोर कसा मांडला, असाही प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सभापतींना ही सभा स्थगित करावी लागली.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती शाहूराव घुटे व सदस्यांत गेल्या अनेक दिवसांपासून समन्वयाचा अभाव आहे. समितीमार्फत कोट्यवधी रुपयांच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात, मात्र सभापती सदस्यांशी जुळवून घेत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करून सदस्यांनी काही सभेवर बहिष्कारही घातला होता. नंतर अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी मध्यस्थी करून समन्वयाचा सल्ला दिला होता. त्यामुळे अंतर्गत वाद मिटला, असे सदस्यांनी सांगितले होते.

त्यानंतर मे महिन्यातील नियोजित मासिक सभा मंगळवारी घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार सदस्य संगीता गायकवाड, सुनंदा वाघ, मंदा गायकवाड, मीरा चकोर, अनिता पवार जिल्हा परिषदेत आले. सभा सुरू होण्यापूर्वीच सदस्यांनी अजेंडा का पाठवला नाही, असा सवाल उपस्थित केला. नियमानुसार सभेपूर्वी सदस्यांना अजेंडा पाठवून सभेबाबत दूरध्वनीहून कळवले जाते. मात्र, अजेंडा पोहोचला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यानंतर सभापती घुटे यांनी सभा तहकूब केली.

याबाबत सदस्य तुकाराम शेंडे म्हणाले, सभापतींकडून दिशाभूल केली जात आहे. विश्वासात न घेता परस्पर मोठे निर्णय घेतले जातात. समाजकल्याण विभागांतर्गत सायकली खरेदी करण्याचा 40 लाखांचा प्रस्ताव परस्पर स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला.

सायकलचा विषय मांडला होता
सायकल खरेदीचा विषय स्थायी समितीसमोर मांडण्यापूर्वी समाजकल्याण समितीसमोर मांडण्यात आला होता. सदस्यांना अजेंडा पाठवले होते. मात्र, ते मिळाले नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अजेंडा का पोहोचत नाही, याची चौकशी करण्यात येईल.’’ शाहूराव घुटे, सभापती.