आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meter Continue, But Estimated Electricity Bill Give

मीटर चालू; तरी 11 महिने अंदाजे वीजबिल, ग्राहकांना 74 हजारांचा भुर्दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सलग अकरा महिने मीटर रीडिंग नसलेले वीजबिल नियमित भरूनही महावितरणने पुन्हा 74 हजारांचे बिल ग्राहक अनिस शेख यांच्या माथी मारले. विशेष म्हणजे संबंधित अधिकार्‍यांनी चूक दुरुस्त करण्याऐवजी बिलातील सात हजार रुपये कमी करून उर्वरित रक्कम हप्त्याने भरा, असा उलट सल्ला शेख यांना दिला. नियमित वीजबिल भरले असतानाही हा भुर्दंड का सहन करायचा, असा प्रश्न शेख यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शेख यांच्याप्रमाणे शहरातील हजारो वीजग्राहकांना महावितरणच्या गलथानपणाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


शहरात सुमारे एक लाख वीजग्राहक आहेत. त्यापैकी हजारो ग्राहकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने दर महिन्याला मनस्ताप सहन करावा लागतो. मीटर रीडिंग घेण्यासाठी महावितरणने खासगी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. रीडिंग न घेताच अंदाजे बिले देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने महावितरणने तीन महिन्यांपूर्वी बुलडाणा येथील अक्षत इलेक्ट्रीकल या ठेकेदाराची हकालपट्टी करून नवीन ठेकेदाराची नेमणूक केली. परंतु या ठेकेदारानेही मागच्याचीच पुनरावृत्ती करत पुन्हा अंदाजे बिले देण्याचा उद्योग सुरू केला. त्यामुळे हजारो ग्राहकांना चुकीची व अवाच्या सव्वा बिले मिळत आहेत.
पॉवर हाऊसजवळील अनिस शेख या ग्राहकाला महावितरणचा असाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेख यांना तब्बल 11 महिने रीडिंग न घेताच बिल देण्यात आले. वीजमीटर सुरळीत सुरू असतानाही त्यांच्या बिलावर मीटर रीडिंग उपलब्ध नसल्याचा (आरएनए) शेरा मारण्यात आला. तरीही शेख यांनी 11 महिने नियमित बिल भरले. परंतु ज्यावेळी जानेवारी 2014 चे 74 हजार रुपयांचे बिल त्यांच्या हातात पडले, त्यावेळी शेख गोंधळून गेले. नियमित बिल भरूनही 74 हजारांचे बिल कसे आले? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या नावे एकूण बिलापैकी 70 हजार 600 रुपयांची थकबाकी दाखवण्यात आली. शेख यांनी महावितरणच्या क्षेत्रिय अभियंत्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी शहर विभागाचे उपकार्यकारी अभियंता एल. एम काकडे यांच्याकडे बोट दाखवले. काकडे यांनी झाला प्रकार चुकीचा आहे, परंतु बिल भरावेच लागेल. हवे तर एकूण बिलातील सात हजार रुपये कमी करतो, उर्वरित रक्कम हप्त्यांनी भरा, असा उलट सल्ला शेख यांना दिला. अकरा महिने नियमित बिल भरले, तरी हा भुर्दंड का सहन करायचा? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे त्यांना या प्रश्नाचे उत्तर महावितरणकडून अजून मिळालेले नाही.


शहरात सर्वसामान्य वीजग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापैकी अनेकांच्या माथी चुकीची वीजबिले देण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडत आहे. महावितरणला मात्र त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही. वर्षातील पाच ते सहा महिन्यांची बिले रीडिंगविना ग्राहकांना देण्यात येतात. त्यात शेख यांच्याप्रमाणे अनेकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. शिवाय चुकीचे बिल दुरुस्त करण्यासाठी महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे महावितरणने मीटर रीडिंगचा गोंधळ थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, एवढीच वीजग्राहकांची माफक अपेक्षा आहे.


शेख यांच्या बिलातील तफावत
0नोव्हेंबर व डिसेंबर 2013 या दोन्ही महिन्यांच्या बिलाची रक्कम सारखी
0 डिसेंबरचे बिल 1 हजार 890, तर जानेवारीचे बिल 74 हजार
0मे व जून या दोन्ही महिन्यांच्या बिलाची रक्कम सारखी
0मार्च ते डिसेंबर या प्रत्येक महिन्यात युनिटचा वापर एकसारखा
0डिसेंबरमध्ये वापरलेले युनिट 194, तर जानेवारीचे युनिट 7 हजार 536


..तर अधिकार्‍यांना जाब विचारणार
विजेच्या पुरेशा उपलब्धतेमुळे महावितरणने आता शिस्त आणि ग्राहकसेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून महावितरणने स्थानिक तक्रार निवारण केंद्रे बंद करून तक्रार टोल फ्री क्रमांकावर नोंदवण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. तसेच वीजपुरवठय़ापासून वीजबिलवसुलीची जबाबदारी निश्चित करून त्याचा जाब संबंधित अधिकार्‍यांना विचारण्यात येणार आहे.


हॉटेलसाठी वीजजोड दिला
शेख यांच्या मीटरचे काही तांत्रिक कारणामुळे रीडिंग घेता आले नाही. शेख यांनी त्यांच्या मीटरमधून भावाच्या हॉटेलसाठी गेल्या तीन महिन्यांपासून वीजजोड दिलेला आहे. त्यांच्या भावाचे बिल 25 ते 30 हजार रुपये येते. त्यामुळे शेख यांना जास्त बिल आले आहे. त्यात महावितरणची काहीच चूक नसल्याचे एका कनिष्ठ अभियंत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.


महावितरणमध्ये ग्राहकांची गर्दी
वीजबिल मिळाले नाही, बिल जास्त आले, बिलावर रीडिंग नाही, युनिट जास्त दाखवण्यात आले, बिल देण्यास विलंब झाला अशा एक ना अनेक तक्रारी ग्राहक महावितरण कार्यालयात मांडतात. महिन्याच्या बिलांचे वितरण झाले की, महावितरण कार्यालयातील गर्दी वाढते. बिल दुरुस्तीसाठी अनेक चकरा माराव्या लागतात. तोपर्यंत बिल भरण्याची मुदत संपलेली असते. त्यामुळे अशा ग्राहकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय अधिकार्‍यांकडून सौजन्याची वागणूकही मिळत नाही.


त्रुटींमुळे बिलात चुका
नगर शहर विभाग एकमध्ये 41 हजार वीज ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांचे रीडिंग महिनाभरात घ्यायचे असते. या काही त्रुटी असल्यामुळे वीजबिलांमध्ये चुका होतात. तीन महिन्यांपूर्वी रीडिंगमध्ये घोळ होत असल्याने बुलडाणा येथील रीडिंग एजन्सीला काढून टाकले होते. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र, चुकीचे रीडिंग आले असले, तरी ग्राहकांकडून वीजवापर होतोच. ग्राहकाने वापरलेला लोड व चुकीची बिले यात दुरुस्ती करण्यात येत आहे.’’ एल. एम. काकडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.


ग्राहक मंचाकडे तक्रार करणार
महावितरणचा गलथानपणामुळे मनस्ताप सहन करावा लागला. 11 महिने रीडिंग घेण्यात आले नाही, तरी मी नियमित बिल भरले. जानेवारीत अचानक 74 हजारांचे बिल हातात पडले. यासंदर्भात अधिकार्‍यांकडे तक्रार केली, तर त्यांनी सात हजारांचे बिल कमी करून उर्वरित रक्कम हप्त्यांनी भरण्याचा सल्ला दिला. याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.’’ अनीस शेख, वीजग्राहक.


त्रुटींमुळे बिलात चुका
नगर शहर विभाग एकमध्ये 41 हजार वीज ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांचे रीडिंग महिनाभरात घ्यायचे असते. या काही त्रुटी असल्यामुळे वीजबिलांमध्ये चुका होतात. तीन महिन्यांपूर्वी रीडिंगमध्ये घोळ होत असल्याने बुलडाणा येथील रीडिंग एजन्सीला काढून टाकले होते. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र, चुकीचे रीडिंग आले असले, तरी ग्राहकांकडून वीजवापर होतोच. ग्राहकाने वापरलेला लोड व चुकीची बिले यात दुरुस्ती करण्यात येत आहे.’’ एल. एम. काकडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.


कर्मचारी हजर नसतात
चालू महिन्यात बिल मिळाले, परंतु बिलात 50 युनिट जास्त दाखवण्यात आले आहेत. यासंदर्भात भिंगार येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी अनेकदा खेट्या घातल्या. परंतु या ठिकाणी एकही कर्मचारी हजर नसतो. त्यामुळे आता मुख्य कार्यालयात तक्रार करण्यासाठी आलो. तक्रार करूनही बिलात दुरुस्ती होईल, असे वाटत नाही. महावितरणने आपल्या कारभारात तातडीने सुधारणा करायला हवी. त्यामुळे ग्राहकांचा त्रास कमी होईल.’’ किशोरसिंग खुटेल, वीजग्राहक.