आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयटी पार्क'ला दराचा खोडा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नागापूर एमआयडीसीतील आयटी पार्कसाठी उद्योजकांनी पुढाकार घेऊनही एमआयडीसीच्या अधिका-यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे ते अद्याप सुरू झालेले नाही. आता अधिकारी गाळ्यांसाठी 22 हजार रूपये चौरस मीटरप्रमाणे दर निश्चित करत आहेत. याच अधिका-यांनी एका बिल्डरला मात्र फक्त साडेपाचशे रुपये प्रतिचौरस फूट दराने संपूर्ण इमारत भाड्याने दिली होती, हे विशेष! मुळात 15 वर्षांपूर्वीची ही इमारत असताना व आता तिची प्रचंड दुरवस्था झालेली असताना असा दर निश्चित करण्यामागे ही इमारत पुन्हा एखाद्या बिल्डर किंवा इतर उद्योगासाठी देण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.
उद्योजक व महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांच्या प्रयत्नांमुळे आयटी पार्कचे भाग्य गेल्या वर्षी जानेवारीत उजळले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ४४ पैकी ३४ गाळ्यांसाठी आयटी उद्योजकांचे प्रस्ताव आले. हे पार्क सुरू होऊन शहरातील एक हजार तरुणांना रोजगार मिळण्याचा आशावाद व्यक्त होत असताना गेल्या वर्षभरात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे गाडे पुढे सरकले नाही.

ज्या ठिकाणी आयटी उद्योग सुरू झाला, त्या शहरांचा झपाट्याने विकास झाला. या उद्योगासाठी अद्ययावत तंत्रज्ञान नगरमध्ये उपलब्ध आहे. आयटीबरोबरच इतर सहाय्यक उद्योगही यानिमित्ताने उभे राहतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योजकांना होता. त्यामुळे त्यांनी एकत्र होऊन प्रयत्न केले. पण अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात कोणतीही कारवाई केली नाही. आता ते आयटी पार्क सुरू करण्यास राजी आहेत, पण त्यांनी गाळ्यांचा दर तिप्पट केला आहे. एकूण त्यांच्या मनात काय आहे, हे समजत नाही, अशी प्रतिक्रिया काही आयटी उद्योजकांनी व्यक्त केली.

15 वर्षे जुन्या इमारतीचा दर मात्र तिप्पट...
एमआयडीसीतील व्यावसायिक प्लॉटचा दर १६५० रुपये प्रति चौरस मीटर आहे. पाचशे चौरस मीटरच्या प्लॉटमध्ये ३० चौरस मीटरचे १६ गाळे निघतात. त्यांचा उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामाचा प्रति चौरस मीटर खर्च १२ हजार रुपये धरला, तरी एका गाळ्याची किंमत चार लाख नऊ हजार पाचशे रुपये होते. परंतु आयटी पार्कमधील 'सरकारी' दर्जाच्या व १५ वर्षे जुन्या बांधकामाचा (त्यात फरशी बसवलेली नाही) दर मात्र २२ हजार रुपये चौरस मीटर आहे. या दरानुसार यातील ३० चौरस मीटर गाळ्याची किंमत सहा लाख ६० हजार रुपये होते. खरेतर एमआयडीसी ही उद्योजकांच्या लाभासाठी आहे. मग येथे एमआयडीसी बिल्डरच्या भूमिकेत कशी काय वागू शकते, असा उद्विग्न करणारा सवाल उद्योजक उपस्थित करतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एमआयडीसीतील व्यावसायिक प्लॉट ९५ वर्षांच्या कराराने मिळतो. आयटी पार्कमधील गाळे मात्र फक्त ३० वर्षांच्या कराराने मिळतील. १५ वर्षे जुन्या इमारतीतील गाळ्यांची किमत कमी होण्याऐवजी तिप्पट करण्यात कोणता तारतम्य भाव आहे, हेच उद्योजकांना समजत नाही. त्यामुळे नगरच्या विकास होऊ नये, अशी या अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा आरोप उद्योजक करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांनाही खो
नागापूर एमआयडीसीतील आयटी पार्क सुरू व्हावे, यासाठी नगरमधील सर्व संगणकविषयक अभ्यासक्रमांत शिकणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांंना निवेदन दिले होते. त्यात या विद्यार्थ्यांनी नगरमधील आयटी पार्क सुूरू कसे गरजेचे आहे, हे पटवण्याचा प्रयत्न केला होता. आयटी पार्क सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना नगर सोडून जावे लागणार नाही, कुटुंबापासून त्यांना दुरावण्याची गरज राहणार नाही व आयटी पार्क सुरू झाल्याने नगर शहराचाही विकास होईल, असे नमूद करण्यात आले होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पाठवण्यात आल्या. त्यात नगरमधील आयएमएससीडीआर, एयएमआरआरडी, पेमराज सारडा महाविद्यालय आदी संस्थांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, त्यांच्या निवेदनांना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले.

'आयटी'ची जागा दुस-या उद्योगांना
आयटी क्षेत्राच्या विकासाला नगरमध्ये मोठा वाव आहे. कारण या क्षेत्रातील चार महाविद्यालये नगर परिसरात आहेत. त्यामुळे या उद्योगासाठी कमी खर्चात मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. तसेच, नगरच्या तरुणांना पुणे-मुंबई व बंगळुरूकडे जाण्याची गरज राहणार नाही. नगरमधून पुण्याला गेलेल्या अनेक तरुण आयटी उद्योजकांची नगरला उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांना जागा मिळत नाही, अशी स्थिती आहे. आयटी पार्कसाठी राखीव असलेली मोकळी जागाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी इतर उद्योगांसाठी देऊन टाकल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
नगरकरांच्या पुढाकाराची गरज
एकीकडे राज्य सरकार मॅग्नेटिक महाराष्ट्र या नावाखाली उद्योगांच्या विकासाचे धोरण आखून ते अमलात आणत आहे. त्यात आयटी उद्योगाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. हे धोरण मात्र एमआयडीसीचे अधिकारी आपणहून पुढे येणाऱ्या उद्योजकांचे खच्चीकरण करण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. काहीही कारणे दाखवून अधिकारी नगरचे आयटी पार्क सुरू होत नाहीत. शहराच्या विकासात मोठी भूमिका बजावू शकणाऱ्या आयटी उद्योगासाठी आता नगरकरांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

वृद्धांचे शहर बनवू नका
आयटी क्षेत्राच्या विकासाला नगरमध्ये मोठा वाव आहे. कारण या क्षेत्रातील चार मोठी महाविद्यालये नगर परिसरात आहेत. तेथे बीसीएस (बॅचलर इन कॉंम्प्युटर सायन्स), बीसीए (बॅचलर इन कॉंम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन), एमसीए (मास्टर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन), एमसीएस (मास्टर इन कॉंम्प्युटर सायन्स), एमसीएम (मास्टर इन कॉंम्प्युटर मॅनेजमेंट) हे अभ्यासक्रम सुरू आहेत. तेथून दरवर्षी दीड हजार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. हे मनुष्यबळ पुणे, मुंबई व बंगळुरूमधील आयटी उद्योगांत जात आहे. नगरमध्ये आयटी उद्योग सुरू झाल्यास या तरुणांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. तरुणांना येथे संधी नसल्याने बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे सध्या नगर शहर वयोवृद्धांचे शहर बनू पाहत आहे. त्याला आळा बसेल.'' संजय गाडेकर, आयटी उद्योजक.