आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांकडून दिला जातो त्रास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एमआयडीसी परिसरातील आपली जागा बळकावण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांकडून कारवाईच्या नावाखाली आपला छळ सुरू असल्याची तक्रार किसन यशवंत डोंगरे (वडगाव गुप्ता) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

डोंगरे यांची जमीन एमआयडीसीने संपादित केली आहे. त्या मोबदल्यात त्यांना एमआयडीसीतील एल झोनमधील आर झेड-5 येथे 1 हजार चौरस मीटर जागा देण्यात आली आहे. त्यांच्या जागेसमोरच महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याचे कार्यालय आहे. या जागेमागे महावितरणच्या अधिकार्‍यांची खासगी घरे आहेत. डोंगरे यांनी या जागेवर साईआर्शम उभारून स्वस्त दरातील भोजनालय सुरू केले होते. ही मोक्याची जागा महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी डोंगरे यांना विकत मागितली. डोंगरे यांनी नकार दिल्यानंतर जानेवारी 2009 पासून या अधिकार्‍यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. संबंधित जागेवर असलेल्या मीटरमध्ये बिघाड असल्याचे भासवून अधिक रकमेचे बिल देणे, मीटर काढून नेणे असे प्रकार वारंवार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून भोजनालय बंद करून डोंगरे हे कुटुंबासह वडगाव गुप्ता येथे वास्तव्यास गेले आहेत.

त्यामुळे अधिक बळ मिळालेल्या अधिकार्‍यांनी जागा मिळवण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले. मीटर काढून नेले असतानाही त्यांच्यावर वीजचोरीची कारवाई करण्यात आली. 4 जुलै रोजी छापा टाकून वीजचोरी पकडल्याचे दर्शवून त्यांना 3 हजार 70 रुपयांचे तडजोड बिल देण्यात आले. कोणत्या पथकाने छापा टाकला याचा साधा उल्लेखही त्यात नाही. केवळ जागा बळकावण्यासाठी हा छळ सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन डोंगरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.