आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीची जलवाहिनी फुटून शेतकर्‍यांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तालुक्यातील देहरे गावाच्या परिसरात एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी वाहिनी सोमवारी सायंकाळी अचानक फुटली. या जलवाहिनीतून प्रचंड वेगाने बाहेर पडणारे लाखो लिटर पाणी परिसरातील शेतामध्ये घुसून शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नाही, तर जलवाहिनीतील फवार्‍याने काही दगड हवेत उडाले. वेगाने उडालेल्या दगडांच्या मार्‍यात रस्त्याने जाणारी वाहने सापडून त्यांचेही नुकसान झाले.

मुळा धरणातून एमआयडीसी परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी जुनी असून तिच्या दुरुस्तीची मुदत संपून 5 ते 10 वर्षे झाली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. जलवाहिनीला लागूनच गंगाराम करंडे यांची शेती आहे. त्यांच्या एक एकर शेतीमध्ये कांद्याच्या बियाण्यांची रोपे होती. जलवाहिनी फुटून त्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे कांद्याच्या बियाण्याची सर्व रोपे वाहून गेली. आता दाद कोठे मागायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

याबाबत माजी पंचायत समिती सदस्य अरुण लांडगे म्हणाले, देहरे परिसरात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. शिवाय जलवाहिनीचे पाणी प्रचंड वेगाने परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये घुसून पिकांचेही नुकसान होते. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे ही जलवाहिनी बदलावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी करण्यात आली आहे. परंतु एमआयडीसीतील काही अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे आजवर ही जलवाहिनी बदलण्यात आलेली नाही.

जलवाहिनी फुटून ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले त्यामध्ये गंगाराम करंडे, दादासाहेब करंडे, आबासाहेब करंडे, सूर्यभान करंडे, आशाबाई करंडे यांचा समावेश आहे. या शेतकर्‍यांची सुमारे एकवीस एकर शेती आहे. या शेतीचे जलवाहिनी फुटून नुकसान झाले. प्रशासनाने या शेतीची पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे.