आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयडीसीवर पुन्हा पाणी कपातीचे सावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. जायकवाडीत फक्त 4.5 टक्के साठा शिल्लक राहिल्याने उद्योजकांची चिंता वाढली आहे. प्रत्यक्षात 8-12 एमएलडी पाण्याची गरज असलेल्या जालना एमआयडीसीत 1-2 एमएलडी पाणी येते. आता यातही कपात झाल्यास कामगारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. सध्या दिवसाकाठी 20 लाख रुपये फक्त पाण्यावर खर्च होतात.

जालना एमआयडीसीत मोठे 14 व छोटे 30 स्टील उद्योग आहेत. यात काही ब्लेड, तर काही सळईचे उत्पादन करतात. या स्टील उद्योगांची पाण्याची गरज मोठी आहे. त्यापाठोपाठ प्लास्टिक, फायबर यासह लघुउद्योगांना पाणी लागते. दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात उद्योजकांना पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसला. पाण्याचा वाढता खर्च, घटलेली मागणी, विजेचे वाढीव दर यामुळे काही उद्योग 8 ते 12 तासांवर येऊन ठेपले होते. मात्र, येथील उद्योजकांनी तब्बल वर्षभर तग धरून कारखाने सुरू ठेवले. यातच गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्यावरील खर्च कमी झाला. तसेच राज्यासह परराज्यातून सळईच्या मागणीत वाढ झाली. काहींनी परदेशात सळईची निर्यात केली. सहा महिन्यांपासून बर्‍यापैकी मागणी असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. मात्र, पावसाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले, तरी पाऊस होत नसल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. दुसरीकडे जायकवाडीत फक्त 4.5 टक्के साठा राहिल्याने पाणी कपातीची शक्यता आहे. याचा फटका जालन्यातील उद्योजकांना बसणार आहे.
पाणी कपातीचे परिणाम
जायकवाडी येथून प्रथम शेंद्रा व त्यानंतर जालना एमआयडीसीत फेज 1 व 2 मध्ये पाणी येते. येथील पाण्याची गरज 8-12 एमएलडीची असली, तरी फक्त 1-2 एमएलडी पाणी येते. मोठ्या कारखान्यात हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कारखान्यात उत्पादनासाठी घेतले जाते. अशा स्थितीत पाणी कपात झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. यामुळे वापराचे पाणी व पिण्याचे पाणी असे स्वतंत्र टँकर मागवावे लागतील. पिण्याच्या पाण्यासाठी वेगळा भुर्दंड बसेल.
पूर्ण क्षमतेने पाणी द्यावे
उद्योजक शासनाला विविध प्रकारचे कर अदा करते. मात्र, उद्योगांना गरजेपुरते पाणी मिळत नाही. यामुळे लाखो रुपये पाण्यावर खर्च होतात. आता पाणी कपातीचे संकट निर्माण झाल्याने खर्चाचा आकडा वाढेल.
अविनाश देशपांडे, अध्यक्ष, लघुउद्योग भारती, जालना
स्टील कारखान्यांची पाण्याची गरज मोठी आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळाल्यास टँकरवरील अतिरिक्त खर्च वाचेल. जायकवाडीतून पाणी कपात झाल्यास पर्यायी स्रोतांचा विचार करून कारखाना चालवायचा तर हे करावेच लागते.
किशोर अग्रवाल, अध्यक्ष, जालना इंडस्ट्रियल आंत्रप्रिन्योर्स असोसिएशन, जालना
उद्योगांचे पाणी कपात करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. उपलब्ध साठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे.
रमेश गिरी, उपअभियंता, एमआयडीसी, जालना
पाण्यावरील खर्च कोटीत
स्टील उद्योगांसारख्या मोठ्या कारखान्यात दिवसाकाठी 35-40 टँकर पाणी लागते. एका टँकरचा खर्च साधारणत: दीड हजार आहे.

- अर्थात 55 ते 60 हजार रुपये टँकरवर खर्च करावे लागतात. स्टील उद्योगाचा विचार केल्यास 14 मोठे व 30 छोटे कारखाने आहेत.
- सर्व कारखान्यांना पाण्यासाठी दैनंदिन 20 लाख रुपये खर्च होतात. महिन्याकाठी हा आकडा सहा कोटींपर्यंत जातो.
- तसेच लघु उद्योगांना दरमहा 20 ते 25 हजार रुपये पाण्यावर खर्च करावे लागतात. पाणीटंचाईचा सर्वच छोट्यामोठ्या उद्योगांना भुर्दंड बसतो.