आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेतील 72 कर्मचार्‍यांचे स्थानांतरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या रखडलेल्या स्थानांतरण प्रक्रियेला सोमवारी मुहूर्त मिळाला. सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 72 कर्मचार्‍यांचे ऑनलाइन पद्धतीने स्थानांतरण करण्यात आले. परंतु अर्थ विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे स्थानांतरण अद्याप झालेले नाही.

शासनाने 18 एप्रिल 2013 रोजी बदलीचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषद कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन व एकाच विभागात पाच वर्षे काम करता येईल. यानुसार पात्र कर्मचार्‍यांचे ज्येष्ठतेनुसार एका विभागातून दुसर्‍या विभागात व एकाच टेबलचे तीन वर्षे काम पाहणार्‍या कर्मचार्‍यांचा टेबल बदलण्याचे सरकारचे निर्देश आहेत. यानुसार स्थानांतरण प्रक्रियेची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील जबाबदारी गटविकास अधिकारी या कार्यासन अधिकार्‍यांवर सोपवली होती.

सेवाज्येष्ठता यादीनुसार रिक्त जागा दाखवून ऑनलाइन पद्धतीने स्थानांतरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांना सूचना देऊन हरकती घेण्यात आल्या. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने 14 ऑक्टोबरची तारीख स्थानांतरणासाठी निश्चित केली. या प्रक्रियेमुळे पारंपरिक पद्धतीने एकाच विभागात एकाच टेबलावर मक्तेदारी असलेल्या कर्मचार्‍यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रशासनाने मुख्यालयाबाहेरील बैठकांचे कारण पुढे करून ही स्थानांतरण प्रक्रिया दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानुसार अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत सोमवारी स्थानांतरण प्रक्रियेला मुहूर्त मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

कक्षअधिकारी एक, कार्यालयीन अधीक्षक पाच, वरिष्ठ सहायक 18 व कनिष्ठ सहायक 48 या कर्मचार्‍यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. हे स्थानांतरण केवळ सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे करण्यात आले आहे. अद्यापही अर्थ विभागांतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे स्थानांतरण झाले नाही. तसेच बहुतेक विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत एकाच टेबलवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे टेबल बदलले नाहीत.

‘अर्थ’चे स्थानांतरण अधांतरी
सामान्य प्रशासन विभागातील स्थानांतरण झाले आहे. अर्थ विभागातील कर्मचार्‍यांचेही स्थानांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू आहे. पुढील आठवड्यात अर्थ विभागातील पात्र कर्मचार्‍यांचे नियमानुसार स्थानांतरण करण्यात येईल.’’ सी. पी. वानखेडे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी (अर्थ विभाग)