आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांच्या आशीर्वादाने जिंकली बबन घोलपांविरुद्धची लढाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद आणि बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिंब्याच्या बळावरच आपण माजी मंत्री बबनराव घोलप यांची बेहिशेबी मालमत्ता न्यायालयात सिद्ध करू शकलो, अशा शब्दांत या प्रकरणी गेली 14 वर्षे न्यायालयीन लढा देणारे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मिलिंद यवतकर यांनी भावना व्यक्त केल्या. घोलप यांनी आपले उत्पन्न हे वैध मार्गानेच असल्याचे दाखवण्यासाठी केलेल्या खटपटी न्यायालयातच उघड्या पडल्या, असे यवतकर यांनी सांगितले. यवतकर यांनीच 1999 मध्ये घोलप यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खटला दाखल करावयास तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारला भाग पाडले होते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांच्याशी झालेला संवाद.

प्रश्न- घोलप प्रकरणाशी तुमचा संबंध कसा आला?
उत्तर- रमेश किणी प्रकरण मीच बाहेर काढले होते. माझ्या पाठपुराव्यामुळे राज ठाकरे यांचे पितळ उघडे पडले. झोपडपट्टी गुंडांसाठी लावला जाणारा एमपीडीए कायदा बाळासाहेब ठाकरे यांना लावण्यासाठीही मी कोर्टात गेलो होतो. त्या वेळी कॉँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ यांनी मला पाठबळ दिले. घोलपप्रकरणी अण्णा हजारेंना तुरुंगवास झाल्यानंतर भुजबळांनीच मला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले.

प्रश्न- बेहिशेबी मालमत्तेचे पुरावे शोधणे कसे शक्य झाले?
उत्तर- कागदपत्रे गोळा करणे यात माझा हातखंडा आहे. मी सर्वप्रथम घोलप यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड शोधून काढले. जुगार खेळण्याबद्दल त्यांना यापूर्वी शिक्षा झाली आहे. शिवसेनेतीलच काही नेत्यांनी माझ्याकडे काही पुरावे पाठवून दिले, तर काही लोकांनीही नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर मदत केली. घोलप यांनी एक मंत्री म्हणून आपल्या अधीनस्थ महामंडळांचा निधी वळवला आणि ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचे त्यावरून समोर आले. याच पुराव्यावरून मी जनहित याचिका दाखल केली. परिणामी तत्कालीन युती सरकारला घोलपांविरुद्ध गुन्हे दाखल करावे लागले.

प्रश्न- प्रकरण शिक्षेपर्यंत कसे पोहोचले?
उत्तर- माझ्या याचिकेमुळे न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला तपासाचे आदेश दिले. तेव्हा गृहमंत्री या नात्याने भुजबळ यांनी पोलिसांना आदेश देऊन कारवाईसाठी पाठिंबाही दिला. 2000 च्या सुमारास खटला दाखल करण्यात आला. मात्र सुमारे 12 वर्षे यावर काहीच सुनावणी झाली नाही. 2012च्या सुमारास मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून विधी व न्याय खात्याने अधिसूचना न काढल्याने प्रकरण रेंगाळल्याचे सांगितले. मग त्यांनी आदेश दिल्यानंतर सर्व प्रक्रिया सुरू झाली. 35 साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

प्रश्न- घोलप यांनी आरोप फेटाळण्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेच असतील ना?
उत्तर- एक खोटी गोष्ट लपवताना माणूस 10 खोट्या गोष्टी बोलून जातो. तसेच काहीसे घोलप यांचे झाले. त्यांचे बालपण अत्यंत सामान्य स्थितीत गेले. मळ्यावर काम करणारी आई आणि चर्मकाराचा व्यवसाय करणारे वडील. मात्र घोलप यांनी न्यायालयाला सांगितले की, वडिलांनी सर्व भावंडांना प्रत्येकी एक किलो सोने वाटून दिले. दूध विक्रीतून आपण लाखो कमावले. मुंबईतील काळबादेवी येथील एका इमारतीचा पत्ता त्यांनी दिला. या इमारतीत आपली बीएस ही दूध डेअरी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र काळबादेवीत अशी इमारतच नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

त्यांच्या पत्नीच्या नावे नाशिक जिल्ह्यातील बेझे या गावी 5 लाख 85 हजार 900 रुपयांचा भूखंड खरेदी करण्यात आला. यासाठी पैसे कुठून आणले असे विचारता त्यांनी आपली पत्नी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोगस पावत्या दिल्या.

गाईच्या पोटी कधी म्हशी जन्माला येतात का? मात्र घोलप यांनीच पोलिसांना सांगितले की त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पाच गाई एका व्यक्तीला सांभाळायला दिल्या. त्या व्यक्तीने काही वर्षात त्यांना याच गाईंच्या पोटी जन्मलेल्या 550 गाई आणि म्हशी परत केल्या. घोलप यांनी दिलेल्या गाई या गावरान होत्या आणि त्यांची पिल्ले मात्र जर्सी. म्हशी तर थेट जाफराबादी. न्यायालयात या व्यक्तीला बोलावण्यात आले तेव्हा तेव्हा घोलपांचे पितळ उघडे पडले.