आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिस्‍त व सत्यनिष्ठा वाढीसाठी सनदी अधिकाऱ्यांना सैनिकी प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सनदी अधिकाऱ्यांत स्वयंशिस्‍त, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व बंधुभाव वाढीस लागावा म्हणून त्यांना नुकतेच सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रथम व द्वितीय श्रेणीतील ५१ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना नगरच्या मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटल येथे (एमआयआरसी) नुकतेच १३ दिवसांचे सैनिकी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार हे प्रशिक्षण देण्यात आले. पुण्याच्या यशदा व नागपूरच्या वसंतराव नाईक स्टेट अॅग्रिकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेंट ट्रेिनंग इन्स्टिट्यूट (वनमती) येथे हे अधिकारी त्यांचे दोन वर्षांचे प्रशिक्षण घेत आहेत.

सैनिक प्रशिक्षण त्यांच्या मुख्य प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. हे प्रशिक्षण लष्कराच्या दक्षिण विभागाच्या नगर, नाशिक, पुणे येथील लष्करी केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांत स्वयंशिस्‍त, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व बंधुभाव वाढीस लागावा हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. तसेच राज्यात विविध संकटाच्या काळात लष्करी व सनदी अधिकाऱ्यांत चांगला समन्वय राहावा, हाही या प्रशिक्षणाचा उद्देश होता. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना लष्करी कार्यशैलीचा परिचय होण्यास या प्रशिक्षणाने मदत होईल, असा विश्वास लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

थेट फायरिंगचेही प्रशिक्षण
या प्रशिक्षणादरम्यान पुरुष व महिला परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना शारीरिक क्षमतेचा विकास, कवायत, नकाशा वाचन, विविध हत्यारांची माहिती व प्रत्यक्ष फायरिंग, वाहनांची देखभाल यांचा समावेश होता. त्यांच्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणात ३९ पुरुष व १२ महिला परिविक्षाधीन अधिकारी सहभागी झाले होेत. ते या प्रशिक्षणादरम्यान एमआयआरसीत वास्तव्याला होते. या दरम्यान लष्कर व नागरी सेवांतील समान प्रकल्पांबाबत विस्तृत चर्चाही करण्यात आली.