आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवा : ओवेसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दलितांवर व मुस्लिमांवर अन्याय अत्याचार झाला, तर पोलिस त्या घटनेचा सखोल तपास करीत नाहीत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. दलितांनाही जगण्याचा अधिकार आहे, हे प्रशासनाने लक्षात ठेवायला हवे. तीन आठवडे उलटूनही जवखेडे हत्याकांडातील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला पाहिजे, अशी मागणी मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीनचे (एमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

शनिवारी खासदार ओवेसी व आमदार इम्तियाज जलील यांनी जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे भेट दिली. हत्याकांडात बळी पडलेल्या संजय जाधव यांच्या आई-वडिलांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार जलील, पँथर संघटनेचे मुकुंद सोनवणे, गंगाधर काळे, बंडू कांबळे, पंडित नवगिरे उपस्थित होते.
जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या तपासाबाबत पोलिस प्रशासन व सरकार संवेदनशील असते, तर घटनेनंतर ४८ तासांच्या आत आरोपी गजाआड झाले असते. मुख्यमंत्रीही याबाबत संवेदनशील नाहीत. आरोपी गजाआड झाले नाही, तर लोकांचा यंत्रणेवरचा विश्वास उडेल. म्हणून नागपूरच्या अधिवेशनात जवखेडे तिहेरी हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी "एमआयएम'चे आमदार करतील, असे ओवेसींनी सांगितले. विधानसभेसाठी आम्ही २४ जागा लढलो, तर त्यांना काँग्रेसला डोकेदुखी झाली. ५० जागा लढलो, तर काय होईल, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली.
आरक्षणात शासनाची घाई नडली
खासदार ओवेसी म्हणाले, दलितांवरील अत्याचार रोखण्यात आधीचे सरकार अपयशी ठरले होते. म्हणून राज्यात सत्तांतर झाले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरक्षण देण्याची घाई केल्यामुळेच उच्च न्यायालयात ते टिकू शकले नाही. याला आधीचे सरकारच जबाबदार आहे. निदान आता, तरी सरकारने त्यातील त्रुटी सुधारून सर्वाेच्च न्यायालयात दाद मागावी. सरकारने तसे केले नाही, तर एमआयएम सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल, असेही ओवेसी यांनी यावेळी सांगितले.
नगर शहरात एमआयएम घुसणार
आगामी काळात नगर शहरातून एमआयएम पक्ष विविध निवडणुका लढवणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. मनपा, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका लढवू. त्यादृष्टीने आतापासूनच पक्षसंघटन सुरू करण्यात येणार आहे. लवकरच मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊ. त्यानंतर एमआयएमची कार्यकारिणी जाहीर केली जाईल. त्यासाठी काही स्थानिक नेत्यांसोबत संपर्क सुरू आहे, असे यावेळी उपस्थित तरुणांना व मुस्लिम नेत्यांना ओवेसी यांनी सांगितले.