आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विवाह; पतीने शारीरिक-मानसिक अत्याचार करून दिले हाकलून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिक्षणाचे स्वप्न पाहणार्‍या 14 वर्षांच्या मुलीला कुटुंबीयांनीच लग्नाच्या बेडीत अडकवले. पतीने मानसिक व शारीरिक छळ करून तिला हाकलून दिले. चाइल्डलाइनने तिला मदतीचा हात देत पोलिस ठाणे गाठले. या बालिकेच्या वतीने फिर्यादी होत पोलिसांनीच नगर तालुका पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

राहुरी येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या या बालिकेचा तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने गुणवडीच्या 25 वर्षीय युवकाशी विवाह करून दिला. वडिलांच्या मृत्यूला वर्ष उलटण्याचा आत 3 जून 2013 रोजी हा विवाह उरकण्यात आला. पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही आई व नातेवाईकांच्या आग्रहापुढे तिचा नाईलाज झाला. शालेय शिक्षण घेण्याच्या वयातच ती सासरी गुणवडीला नांदायला गेली. दारू पिऊन मारहाण करत पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शरीरसंबंधाला नकार देणार्‍या या बालिकेला 4 जुलै रोजी पतीने घरातून हाकलून दिले. चाइल्डलाइनच्या 1098 या हेल्पलाइन क्रमांकावर एक मुलगी विळद घाट परिसरात फिरत असल्याचा निनावी फोन आला. संस्थेचे समन्वयक कुंदन पठारे यांनी तिचा शोध घेऊन तिला कार्यालयात आणून मदतीचा हात पुढे केला. समुपदेशिका कल्याणी गरुड हिने विश्वासात घेत तिला बोलते केले. त्यानंतर या बालिकेने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला.

शुक्रवारी या बालिकेला सोबत घेऊन चाइल्डलाइनच्या कार्यकर्त्यांनी नगर तालुका पोलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी स्वत: फिर्यादी होत घटनेसंदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, आई, मावशी, काका, सासू, सासरा, दीर यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.