आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक, संभाजी ब्रिगेडचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गृह,पर्यटन, आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर मंगळवारी सकाळी संभाजी ब्रिगेडच्या सुमारे आठ ते दहा कार्यकर्त्यांनी सकाळी दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. ‘बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास खबरदार!’ असा इशारा देणारी पत्रकेही कार्यकर्त्यांनी परिसरात फेकली.
सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नगर-मनमाड महामार्गावरील सावेडी दत्त मंदिराच्या जवळ असलेल्या शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात घुसले. त्यांनी सर्व प्रथम कार्यालयात जाऊन तेथे उपस्थित असलेल्या शिंदे यांचे स्वीय साहाय्यक सुरेश काळे यांना, आम्हाला तुमच्या कार्यालयात मोडतोड करायची आहे, असे सांगितले. त्यावर काळे यांनी असे करण्यास विनवले. तुमचे म्हणणे किंवा निवेदन द्या, ते योग्य ठिकाणी पाठवतो. कार्यालयाच्या फर्निचरचे काम नुकतेच झाले आहे. त्याचे बिलही अद्याप दिलेले नाही, असेही ते म्हणाले. पण, कार्यकर्त्यांनी आमचा मंत्री शिंदे यांच्यावर राग नाही, तर आम्हाला सरकारचा निषेध करायचा आहे, असे म्हणत त्यांनी खिडक्यांवर भराभर दगड फेकून त्यांच्या काचा फोडल्या. नंतर घाईन कार्यकर्ते बाहेर जाऊन त्यांनी परत दगडफेक करून बाहेरच्या बाजूच्या काचा फोडल्या. एका कार्यकर्त्याने त्यावेळी आपल्या निवेदनाची पत्रकेही उधळली. अवघ्या सहा-सात मिनिटांत हा प्रकार होऊन कार्यकर्ते तेथून घोषणा देत निघूनही गेले.
त्यानंतर सर्वत्र या प्रकाराची चर्चा सुरू झाली. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मोरे यांनी तेथे तातडीने पोलिस बंदोबस्त तैनात केला. घटनेची माहिती मिळताच खासदार दिलीप गांधी यांनी तातडीने तेथे धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. सरकारच्या एखादा निर्णय अप्रिय वाटू शकतो. पण, अशा प्रकारांमुळे समाजात दुफळी निर्माण होत असल्याने या घटनेचा आपण निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर शहरातील जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांच्या कार्यालयाला भेट दिली.

रात्री उशिरा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर मधुसूदन मुळे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यावर कवडे यांनी पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना बोलावून घेतले. त्यांनी घटनेचे छायाचित्रण उपलब्ध असल्याने आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले.
पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड करताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते. दुसऱ्या छायाचित्रात कार्यालयाच्या खिडकीच्या फुटलेल्या काचा. छाया : धनेश कटारिया, अिनल शाह.

घटनेचे छायाचित्रण उपलब्ध
तोफखानापोलिसांनी या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदा जमाव जमवून धुडगूस घालणे, अनधिकृतपणे प्रवेश करणे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.तपास निरीक्षक मोरे करत आहेत. या प्रकरणी व्हिडिओ छायाचित्रण उपलब्ध असल्याने धुडगूस घालणाऱ्यांची ओळख पटली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती समजली.

या घटनेच्या वेळी उधळण्यात आलेल्या पत्रकात ‘आज फक्त कार्यालयावर कारवाई - उद्या पुरंदरला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देताल, तर खबरदार!’ अशा इशारेवजा मथळ्याखाली पुरंदरे यांना का पुरस्कार देऊ नये, याची कारणमिमांसा देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, की पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ बहुजन स्त्रियांची बदनामी केली आहे.
त्यांच्याविरोधात कोल्हापूर पुणे येथे न्यायालयात खटले सुरू आहेत. असा माणसाला मानाचा हा पुरस्कार देऊ नये, यासाठी आम्ही निवेदने, विनंत्या, पत्रव्यवहार, चर्चा शिवसन्मान परिषदा घेतल्या, राज्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हाताला काम नाही, अन् सरकार पुरंदरेंना पुरस्कार देण्यासाठी हट्टाला पेटले आहे. छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, या घोषणा देऊन शिवप्रेमींची मते मिळवली. सरकार स्थापन करून तेच आज शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत. याची चीड येऊन आमच्या भावनांचा उद्रेक होत आहे. म्हणून आम्ही सरकार मंत्र्यांचा निषेध करत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.