आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister's Taluka Get 20 Crores In Nagar District

नगर जिल्‍ह्यात मंत्र्यांच्या तालुक्यांना तब्बल 20 कोटी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - फळबागा वाचवण्यासाठी जिल्ह्यातील तीन मंत्र्यांच्या तालुक्यांसाठी तब्बल 20 कोटी, तर उर्वरित 11 तालुक्यांसाठी केवळ 30 कोटींचे अनुदान मिळणार आहे. सर्वाधिक 7 कोटी 84 लाख 43 हजारांचे अनुदान पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंद्याला मिळणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता तालुक्याला 5 कोटी 70 लाख, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील शेतकर्‍यांना 6 कोटी 56 लाख 25 हजारांचे अनुदान मिळणार आहे.

दुष्काळामुळे जिल्ह्यातील फळबागा जळाल्या असून शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने फळबागा वाचवण्यासाठी अनुदान जाहीर केले आहे. जिल्ह्यातील 61 हजार 168 शेतकर्‍यांना हेक्टरी 15 हजार रुपयांप्रमाणे हे अनुदान मिळेल.

जिल्ह्यातील सुमारे 33 हजार 520 हेक्टर क्षेत्रावरील फळबागा पाण्याअभावी जळाल्या आहेत. फळबागांसाठी 50 कोटी 28 लाखांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले असून 20 कोटींचे अनुदान यापूर्वीच शेतकर्‍यांच्या बँकखात्यात जमा करण्यात आले आहे.

नगर तालुक्यातील 6186 शेतकर्‍यांना 6 कोटी 17 लाख 80 हजार, पारनेरमधील 3957 शेतकर्‍यांना 2 कोटी 88 लाख 63 हजार, पाथर्डीतील 3550 शेतकर्‍यांना 3 कोटी 34 लाख 50 हजार, संगमनेरमधील 11 हजार 884 शेतकर्‍यांना 6 कोटी 56 लाख 25 हजार, अकोल्यातील 2819 शेतकर्‍यांना 1 कोटी 86 लाख 44 हजार, कोपरगावातील 2 हजार 35 शेतकर्‍यांना 2 कोटी 55 लाख 19 हजार, राहात्यातील 4879 शेतकर्‍यांना 5 कोटी 69 लाख 19 हजार, र्शीरामपूरमधील 997 शेतकर्‍यांना 1 कोटी 23 लाख 75 हजार, नेवाशातील 1598 शेतकर्‍यांना 2 कोटी 4 लाख 89 हजार, राहुरीतील 1423 शेतकर्‍यांना 1 कोटी 78 लाख 28 हजार, शेवगावातील 1423 शेतकर्‍यांना 1 कोटी 47 लाख 96 हजार, कर्जतमधील 4723 शेतकर्‍यांना 4 कोटी 47 लाख 96 हजार, र्शीगोंद्यातील 12,267 शेतकर्‍यांना 7 कोटी 84 लाख 43 हजार व जामखेडमधील 3336 शेतकर्‍यांना 2 कोटी 63 लाख 99 हजार 500 अनुदान मिळणार आहे.
अनुदानाबाबत संभ्रम

कृषी विभागाने 31 मार्चअखेरपर्यंत शेतकर्‍यांच्या बँकखात्यात अनुदान जमा होणार असल्याचे जाहीर केले होते. एप्रिलचे पंधरा दिवस उलटले, तरी शेतकर्‍यांच्या खात्यात अजून अनुदान जमा झालेले नाही. अनुदान कधी जमा होणार आहे याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे.
अनुदान समप्रमाणात द्या..
विधानसभेत अनुदानाबाबत चर्चा झाली. फळबागा अनुदानाचे समप्रमाणात वाटप होणे गरजेचे आहे. मंत्र्यांच्या तालुक्यांना सर्वाधिक अनुदान व दुसर्‍या तालुक्यांना कमी अनुदान हे चुकीचे आहे. ज्या भागात जास्त नुकसान झाले, त्या भागाला प्राधान्याने अनुदान द्यावे. तसे न झाल्यास शिवसेना आंदोलन करेल.’’ अनिल राठोड, आमदार, शिवसेना.
लिंबाचे क्षेत्र सर्वाधिक
जिल्ह्यात आंबा, डाळिंब, मोसंबी, चिकू, लिंबू, केळी, चिंच, नारळ, संत्रा, आवळा, जांभूळ, द्राक्षे, सीताफळ, रामफळ, पपई, कलिंगड, खरबूज, काजू व फणस ही फळे होतात. लिंबाचे सर्वाधिक 5 हजार 414 हेक्टर क्षेत्र आहे. त्याखालोखाल आंब्याचे क्षेत्र 2 हजार 616 हेक्टर आहे.
जिल्ह्यातून होते 15 हजार 350 टन फळांची निर्यात

जिल्ह्यातील फळबागांमधून 4 लाख 97 हजार 300 टन उत्पादन निघते. स्थानिक बाजारात 22 हजार टन फळे विक्रीसाठी जातात. जिल्ह्यातून 15 हजार 350 टन फळांची निर्यात होते. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक येथे फळे पाठवली जातात. आंध्रप्रदेश व गुजरातमध्येही फळांची निर्यात होते.