आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलींना फसवून लावले वाममार्गाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरातील अल्पवयीन मुलींना विलास कराळे व त्याच्या साथीदारांनी फसवून वाममार्गाला लावल्याचे साक्षीदार अँड. संजय ठाणेकर यांनी सरतपासणीदरम्यान गुरुवारी न्यायालयात सांगितले.

राज्यभर गाजलेल्या येथील सेक्सस्कँडलच्या दुसर्‍या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डी. एस. शिंदे यांच्यासमोर सुरु आहे. अँड. ठाणेकर हे या प्रकरणातील आरोपी विलास कराळेचे मित्र होते. 2002 मध्ये त्यांची मैत्री झाली. कराळे, ठाणेकर व सदाशिव साबळे यांनी 2002 ते 2004 या काळात सावेडी व अरणगाव परिसरात भागीदारीमध्ये मसाज पार्लर सुरु केले होते. मात्र, त्यांची भागीदारी तुटली व कराळे याने स्वतंत्रपणे मसाज पार्लर सुरु ठेवले. कराळेशी व्यावसायिक संबंध तोडले, तरी त्यांची मैत्री कायम होती. कराळे व इतर आरोपींच्या विविध ठिकाणी झालेल्या बैठकांचेही ठाणेकर साक्षीदार आहेत. अल्पवयीन मुलींना फसवून गैरमार्गाला लावण्याचा उद्योग कराळे व त्याचे साथीदार करत असल्याचे ठाणेकर यांना कराळेशी झालेल्या संवादातून माहिती झाले. या उद्योगापासून परावृत्त होण्याचा सल्लाही ठाणेकर यांनी कराळेला दिला. मात्र, कराळे व त्याचे साथीदार ठाणेकर यांची टिंगल करत असत.

दरम्यान, सेक्सस्कँडल उघडकीस येऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ठाणेकर यांचीही चौकशी केली. कराळेला वाचवण्यासाठी अँड. महेश तवले व अँड. संजय दुशिंग यांनी पीडित मुलीच्या वडिलांना दारु पाजून फोडण्याचा प्रयत्न केल्याचेही ठाणेकर यांनी त्यांच्या सरतपासणीत सांगितले. पीडित मुलींना फितवण्याचा प्रयत्नही या वकिलांनी केल्याचे ठाणेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सीआयडीचे विशेष सरकारी वकील अँड. विजय सावंत यांनी ठाणेकर यांची सरतपासणी घेतली. गुरुवारी त्यांची सरतपासणी पूर्ण झाली असून 22 ऑगस्टला आरोपींच्या वकिलांकडून ठाणेकर यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे.