आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयआरसीत जवानांचे शानदार दीक्षांत संचलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) मधील 309 जवानांनी शनिवारी शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. लष्करीदृष्ट्या मित्र देश असलेल्या अफगाणिस्तान, श्रीलंका व बांगलादेश, म्यानमार या देशांतील लष्करी अधिकार्‍यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल डिफेन्स कॉलेजचे मेजर जनरल अनुराग गुप्ता उपस्थित होते. त्यांनीच संचलन करणार्‍या जवानांकडून मुख्य सलामी स्वीकारली. देशाच्या मान, सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी जवानांच्या खांद्यावर आहे. देशाचे रक्षण करणे, जवानाचे परमकर्तव्य आहे. जवानांच्या शिस्त व वर्तनावर रेजिमेंटची शान अवलंबून असते. त्यासाठी वेळ पडल्यास जवान आपल्या प्राणांचीही पर्वा करीत नाहीत, असा भारतीय सैन्याचा गौरवशाली इतिहास आहे. आज येथे शपथ घेणारे जवानही तो कायम ठेवतील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जनरल गुप्ता म्हणाले, ‘‘सध्या देशाला फक्त सीमेबाहेरच्या शत्रूंपासूनच फक्त धोका नाही, तर काही अंतर्गत फुटीर शक्ती देशाला धोका निर्माण करीत आहेत. जवानांना सर्व शक्तिनिशी त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही लोकांना मदतीची महत्त्वाची जबाबदारी पेलावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाठवले जाईल तेथेही तुम्ही सैन्य धर्माचे पालन करा. ’’

एमआयआरसीतील अखौरा ड्रिल स्क्वेअर मैदानात सकाळी 309 जवानांनी सादर केलेल्या शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.
प्रथम कर्नल संतोष जयस्वाल व नंतर एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप भाटी यांनी सलामी स्वीकारली. ते परत गेल्यावर संचलनाचे प्रमुख पाहुणे मेजर जनरल गुप्ता यांचे सलामीमंचावर आगमन झाले. जवानांनी त्यांना सलामी दिल्यानंतर उघड्या जीपमधून गुप्ता यांनी संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड अँड्ज्युटंट मेजर व्ही. डी. चाको यांनी संचलनाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी आवाहन केल्यानंतर राष्ट्रीय ध्वज घेतलेल्या तुकडीचे मैदानात आगमन झाले. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. सर्व उपस्थितांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर हिंदू, शीख, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मगुरुंचे मैदानात आगमन झाले. त्यांच्याकडील धर्मग्रंथांवर हात ठेवून जवानांना देशरक्षणाची शपथ घेतली. यानंतर सर्व जवानांनी बँडपथकासह संचलन करीत सलामी मंचासमोर जाऊन गुप्ता यांना सलामी दिली.