आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

133 जवानांचे शानदार संचलनासह शपथग्रहण, संचलनाने जिंकली उपस्थितांची मने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) मधील १३३ जवानांनी गुरुवारी सकाळी शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. एमआयआरसीची ही ३८४ वी तुकडी होती. या नंतर हे जवान आता विशेष प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

या संचलनाची मुख्य सलामी एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा यांनी स्वीकारली. ते म्हणाले, की सध्या देशाला फक्त सीमेबाहेरच्या शत्रूंपासूनच फक्त धोका नाही, तर काही अंतर्गत फुटीर शक्ती देशाला धोका निर्माण करीत आहेत. जवानांना सर्व शक्तिनिशी त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही लोकांना मदतीची महत्त्वाची जबाबदारी पेलावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाठवले जाईल, तेथेही तुम्हाला सैन्य धर्माचे पालन करावे लागणार आहे. देशाच्या मान, सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी जवानांच्या खांद्यावर आहे. आपले काम प्रामाणिकपणे करा. देशाचे रक्षण करणे, ही जवानाचे परमकर्तव्य आहे. जवानांच्या शिस्त व वर्तनावर रेजिमेंटची शान अवलंबून असते. त्यासाठी वेळ पडल्यास जवान आपल्या प्राणांचीही पर्वा करीत नाहीत, असा भारतीय सैन्याचा गौरवशाली इतिहास आहे. आज येथे शपथ घेणारे जवानही तो कायम ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शानदार संचलनाबद्दल त्यांनी जवानांचे अभिनंदन केले.
ब्रिगेडिअर वर्मा यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारल्यानंतर उघड्या जीपमधून त्यांनी संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड अॅडज्युटंट मेजर रजनीश कुमार यांनी संचलनाची सुत्रे स्वीकारली. त्यांनी आवाहन केल्यानंतर राष्ट्रीय ध्वज घेतलेल्या तुकडीचे मैदानात आगमन झाले. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली. सर्व उपस्थितांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर हिंदू, शीख, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मगुरुंचे मैदानात आगमन झाले. त्यांच्याकडील धर्मग्रंथांवर हात ठेवून जवानांना देशरक्षणाची शपथ घेतली.

त्यानंतर मेजर रजनीश कुमार यांनी जवानांना देशनिष्ठेची शपथ देवविली. त्यानंतर सर्व जवानांनी बँडपथकासह संचलन करीत सलामी मंचासमोर जाऊन ब्रिगेडिअर वर्मा यांना सलामी दिली. तया शानदार संचलनाबद्दल उपस्थित वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले.
जनरल सुंदरजी सुवर्णपदक राकेश यांना प्रदान
गुरुवारच्या संचलनात प्रशिक्षणादरम्यान सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ब्रिगेडिअर वर्मा यांनी रिक्रुट राकेश कुमार याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, मनदीपसिंग याला जनरल सुंदरजी रौप्य पदक, तर महेश बाबर याला जनरल सुंदरजी कांस्य पदक प्रदान केले.