आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Misappropriation Of Money In Municipal Urban Bank

खासदार गांधी यांच्यासह 54 जणांविरूद्ध गुन्हा, 'अफरातफरीची फिर्याद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर अर्बन बँकेत पावणेदोन कोटी रुपयांची अफरातफर व फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्यासह 54 जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (10 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला. 9 विद्यमान संचालकांसह माजी संचालक, अधिकारी व कर्जदारांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. सन २००९-१० या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटींच्या आधारे शासकीय लेखापरीक्षक चंद्रकांत वसंत पवार यांनी संबंधितांविरूद्ध फिर्याद दिली.
तब्बल पावणेपाच वर्षांनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सन २००९-१० या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पवार यांनी केले. लेखापरीक्षणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या. बँकेच्या मुख्य कार्यालयासह विविध शाखांमधील कामकाजात गंभीर त्रुटी अाढळून आल्या. आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून नियमबाह्य कर्जप्रकरणे मंजूर केली. कागदपत्रांची कोणतीही खातरजमा न करता कर्तव्यात कसूर करत कर्जदारांना नियमबाह्य लाभ दिला. बेकायदेशीरपणे खर्च करून बँकेच्या रकमेची अफरातफर केली. बँकेच्या १ कोटी ७६ लाख ३८ हजार ४०८ रुपयांच्या आर्थिक नुकसानीस आरोपी जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या कर्जमर्यादा धोरणाचे उल्लंघन करून तीन शाखांमधून झालेले नियमबाह्य कर्जवाटप, तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या नावे बोगस खर्च, पुण्यातील सदाशिव पेठ शाखेतील नियमबाह्य वाहनकर्ज, पंचरत्न अॉटो सर्व्हिसला एकरकमी कर्जफेडीचा नियमबाह्य लाभ आदीतून बँकेला पावणेदोन कोटी रुपयांचा फटका आरोपींना दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अारोपींविरूद्ध अफरातफर, फसवणूक, संगनमताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढाेकले या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा-
खासदार दिलीप मनसुखलाल गांधी, सुवालाल गुंदेचा, पुष्पा कासट, पारस कोठारी, दीपक गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, जवाहरलाल मुथा, राजेंद्र गांधी, मुकुंद मुळे, अशोक बोरा, संजय लुणिया, सुरेश बाफना, नवनीतलाल बोरा, दीपक दुग्गड, विजयकुमार मंडलेचा, दीप चव्हाण,अमृतलाल गट्टाणी, संजय छल्लारे, अॅड. अभय आगरकर, साधना भंडारी, राजेंद्र बोरा, रमेश परभाणे, राजेंद्र मालू, लता लोढा, राजेंद्र पिपाडा, नवनीत सुरपुरिया, सुधीर खेर, दिलीप गुगळे, मनोज फिरोदिया, राजेंद्र डोळे, नवीनचंद गांधी, दिलीप ब्रह्मे, पोपट गंगावणे, अशोक हळपावत, दामोदर साळवे, पांडुरंग भोसले, प्रवीण कुलकर्णी, प्रवीण पाचारणे, शिवाजी शेटे, सुवेंद्र गांधी, संगीता गांधी, सुधीर तावरे, तिलकराज पासी, नीलेश शेळके, मारुती फल्ले, सुभाष मुनोत, एम. एस. शिंदे, एस. आर. निमसे, अशोक मुनोत, राजेंद्र लुणिया, घनश्याम बल्लाळ.
आठवड्याभरापूर्वी फिर्याद देण्यासाठी येऊन गेले पवार
गेल्या पंधरा दिवसांपासून अफरातफरप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा होती. लेखापरीक्षक पवार हे आठवड्यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन चर्चा करून परत गेले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू असून म्हणणे सादर करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे.