आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ झेडपीसाठी सरसावले कर्मचारी, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्येही होणार स्वच्छता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पहिल्या व तिसऱ्या शनिवारी चार तास स्वच्छता अभियान चालवले जाणार आहे. या अभियानाला शनिवारपासून सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांतील कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी सरसावल्याचे दिसून आले. हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याने लवकरच सर्व इमारती चकाचक होणार आहेत.
जिल्हा परिषदेसह बहुतेक शासकीय विभागांच्या कार्यालयांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र पहायला मिळते. कार्यालयात कोपऱ्यात पडलेल्या फायलींचा ढीग, टेबलावर साचलेली धूळ, खुर्ची भोवताली पडलेले कागदाचे कपटे, कपाटांमध्ये ठेवलेल्या अस्ताव्यस्त फायली, अशी अवस्था असते. सकाळी कार्यालय उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामामुळे स्वत:च्या टेबलची स्वच्छता करायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कार्यालये स्वच्छ होत नाहीत. बऱ्याचदा एखादी महत्त्वपूर्ण फाईल, इतर फाईलींमध्येच हरवलेली असते. ती वेळेवर सापडत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून या फायलींचा शोध सुरू आहे. शनिवारपासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पहिल्या व तिसऱ्या शनिवारी कार्यालय व परिसर स्वच्छता अभियानाला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळपासून स्वच्छतेला सुरुवात केली. अनेकांना हरवलेल्या फायलीही सापडल्याचा आनंद झाला. सकाळी मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, यांनी देखील झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. त्यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, अनंत महाजन आदी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली.
मुख्यकार्यकारी अधिका-यांना वाढदिवसाची भेट
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांचा शनिवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याची चर्चा सुरू होती. तथापि स्वच्छता मिशनच्या अधिकाऱ्यांनी हा योगायोग असून आम्हालाही सकाळी वाढदिवसाची माहिती समजली. पण, यानिमित्ताने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना स्वच्छ कार्यालय ही एक भेट ठरली असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
टप्प्याटप्प्याने स्वच्छता होईल
स्वच्छता अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात आम्ही टेबलवरची धूळ आणि कपाटे स्वच्छ केली. त्याबरोबरच भिंती व फरशी देखील स्वच्छ करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून ते देखील उत्साही आहेत. अंतर्गत स्वच्छता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने परिसरही स्वच्छ केला जाईल.'' उज्ज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
फेकलेला कचरा तसाच...
दिवसभर कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता सुरू होती, कार्यालयातील कचरा कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागासमोर एकत्र टाकला होता. दिवसभर स्वच्छता अभियान सुरू असल्याची चर्चा असताना सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा एकत्रित कचरा उचलण्यात आला नाही.