आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरो‍पीनां आटक करण्‍यासाठी राठोडांसह व्यापा-यांचा ‘कोतवाली’ला घेराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कापडबाजारात काही दंगलखोरांनी मंगळवारी (17 जून) रात्री दगडफेक केली. यामध्ये अनेक दुकानांचे नुकसान झाले. ही दंगल घडवून आणणा-या आरोपींना तत्काळ अटक करावी, तसेच व्यापा-यांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला. घेरावनंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्याशी आमदार राठोड व व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. राठोड म्हणाले, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास 40 ते 50 दंगलखोरांनी जुना कापड बाजार परिसरात दगडफेक करून दुकानाच्या काचा फोडून नुकसान केले. यामध्ये अनेक व्यापारी जखमी झाले. कोतवाली पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी काही दंगेखोरांना पकडून चोप दिला. परंतु त्यानंतर केवळ दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला. अद्याप यापैकी एकाही दंगलखोराला अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलेले नाही.
ही घटना गंभीर असूनही पोलिस प्रशासनाने याची दखल घेतलेली दिसत नाही. आरोपींपैकी काहीजण मोकाट फिरत आहेत. त्यामुळे व्यापा-यांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक केली, तर पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत. कोतवाली पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असे राठोड म्हणाले. मंगळवारी घडलेल्या दंगलीच्या प्रकाराबाबत दहशत निर्माण झाली असल्याची कैफियत कापड बाजार परिसरातील व्यापा-यांनी मांडली. आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड, व्यापारी असोसिएशनचे रमेश मुथा, किरण बोरा, संजय भंडारी, दीपक कावळे उपस्थित होते.