आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर महावितरणच्या अधिका-यांना काळे फासू- आमदार अनिल राठोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील भारनियमन दोन दिवसांत बंद झाले पाहिजे; अन्यथा महावितरणच्या अधिका-यांना काळे फासून कार्यालयात डांबू, असा इशारा आमदार अनिल राठोड यांनी शुक्रवारी दिला. शहरातील वाढत्या भारनियमनाविरोधात शिवसेनेने राठोड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना भारनियमन रद्द करण्याचे निवेदन दिले.
शहरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ‘इमर्जन्सी लोडशेडींग’ च्या नावाखाली दिवसा-रात्री अचानकपणे वीज घालवण्यात येत आहे. यामुळे नगरकरांमध्ये महावितरणबाबत नाराजी आहे. याची दखल घेत तीन दिवसांपूर्वी राठोड यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांची भेट घेत दोन दिवसांत भारनियमन रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, दोन दिवसांनंतरही भारनियमन ‘जैसे थे’च राहिल्याने शुक्रवारी शिवसेनेने राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरुडे, संजय चोपडा, दिलीप सातपुते, विक्रम राठोड यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जाधव यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना राठोड म्हणाले, येथील महावितरणचे अधिकारी सक्षम नाहीत. त्यांना भारनियमन कमी करण्याचा अधिकार नाही. ते कागदपत्रे घेऊन वर पाठवतात. दिवसा, रात्री केव्हाही अचानक वीज जाते. वीज केव्हा येईल? का गेली? याबाबतची माहिती कर्मचा-यांना नसते. महावितरणने जे टोल फ्री नंबर दिले आहेत. ते चुकीचे आहेत. अधिकारी फोन उचलत नाहीत. शहरातील सर्व विभाग अ ते ड वर्गात येतात. त्यामुळे शहरात भारनियमन व्हायला नको. अ ते ड भागातील ग्राहक नियमित वीजबिले भरतात, तरीही त्यांच्यामाथी भारनियमन लादले जात आहे. या भारनियमनामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. तीन-चार तास वीज गेल्याने लघू उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हे भारनियमन दोन दिवसांत रद्द करावे, अन्यथा महावितरणच्या अधिका-यांना काळे फासू, असा इशारा राठोड यांनी दिला. काळे फासल्यानंतर आमदार त्रास देतात, असे म्हणू नका. त्याला तुम्हीच जबाबदार राहणार, असे त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, बापूसाहेब गोरे यांना सांगितले. दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता हजारे हे मुंबई येथे बैठकीला असल्याने ते शुक्रवारी हजर नव्हते. त्यांच्या उपस्थितीत सोमवारी (26 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात भारनियमनाबाबत निर्णय होणार आहे.

बिल भरणा-यांना अ, ब गटांत टाका

जे ग्राहक नियमित भरतात. त्यांना अ व ब गटात टाका आणि जे बिल भरत नाहीत, त्यांना दुस-या गटात टाका. जे नियमितपणे बिल भरतात. त्यांना नाहक भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. वीज गळती रोखणे आणि वसुली करणे हे महावितरणचे काम आहे. त्यात प्रामाणिक ग्र्राहकांना कशाला गोवतात. वसुलीसाठी अधिकारी-कर्मचा-यांची संख्या वाढवा.
कार्यालयात रात्रीही अधिकारी असावा
रात्रीच्या वेळी शहरातील पॉवर हाऊस, भिंगार, केडगाव, गंजबाजार, माळीवाडा, फकीरवाडा, दिल्लीगेट, भिस्तबाग, एमआयडीसी या कार्यालयात एक अधिकारी ठेवावा. रात्री वीज गेल्यास अधिकारी फोन उचलत नाही. संबंधित उपकेंद्रांत विजेसंदर्भात कर्मचा-यांना काहीही माहिती नसते. त्यामुळे रात्रीही कार्यालयात अधिकारी असावा, असे राठोड म्हणाले.
ई’ गटात गेल्याने केडगावात भारनियमन
केडगाव येथे वीजचोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणने मोहीमही राबवली. मात्र, तेथे स्थानिक नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. सध्या केडगावात एलटी लोड जास्त आहे. केडगाव परिसर अगोदर ‘ड’ गटात असल्याने तेथे भारनियमन नव्हते. आता हा परिसर ‘इ’ गटात गेला आहे. त्यामुळे तेथे भारनियमन सुरू झाले.

अर्ध्या रात्री रस्त्यावर उतरू
शहरात रात्री-अपरात्री होत असलेल्या भारनियमनामुळे वृद्धांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. महावितरणने दिलेले टोल नंबर चुकीचे आहेत. रात्री अधिकारी उपलब्ध होत नाहीत. अधिकारी नसल्याने रात्र अंधारात काढावी लागते. वीज गेल्यास मला फोन करा, अर्ध्या रात्री नागरिकांसाठी रस्त्यावर उतरू. ’’ अनिल राठोड, आमदार.
‘इमर्जन्सी’च्या नावाखाली फसवणूक
वीज गेल्यावर महावितरण कार्यालयात फोन केल्यावर वीज कशामुळे गेली? केव्हा येणार? याची विचारणा केली असता. कर्मचारी सांगतात की, वरून ‘इमर्जन्सी लोडशेडींग’ आहे. वीज केव्हा येईल सांगता येत नाही. वीज गेल्यानंतर ‘इमर्जन्सी’चे नाव सांगून कर्मचारी मोकळे होतात, असा आरोप संभाजी कदम यांनी केला.