आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे जेवढे वय तेवढा त्यांचा राजकीय अनुभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आमदार अनिल राठोड यांचा शहराचा अभ्यास झाला आहे. कोणत्या वेळी कोणते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे हे त्यांना चांगले जमते. निवडणूक जवळ आली की त्यांचा हा ठरलेला कार्यक्रम असतो. आम्ही मात्र नवीन आहोत. आमचे जेवढे वय आहे, तेवढा त्यांचा राजकीय अनुभव आहे. पण आतापर्यंत तुम्ही काय केले? अशी जबाबदारी झटकून का वागता? अशी बोचरी टीका महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून राठोड व जगताप यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राठोड यांचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट आहे, असा आरोप जगताप यांनी केला होता, तर महापौरांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, असा आरोप राठोड यांनी केला होता. त्यास उत्तर देण्यासाठी जगताप यांनी सोमवारी तोफ डागली. ते म्हणाले, राठोड यांनी आतापर्यंत अनेक घोषणा केल्या. विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करू, असे अनेकदा सांगितले, परंतु या प्रश्नांचे पुढे काय झाले ते कुणालाच माहीत नाही. राठोड यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. परंतु त्यांच्या आरोपांमुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी उत्तरे द्यावी लागतात. त्यांना काहीच काम नसले, तरी आम्हाला खूप कामे आहेत. मी आतापर्यंत शहरासाठी किती निधी आणला हे जर त्यांना माहिती नसेल, तर त्यांना शहराचा पाणीप्रश्न कसा माहिती असेल, असा सवाल जगताप यांनी केला.

शहर सुधारित पाणी योजना (फेज टू), नगरोत्थान योजना, सीना नदी सुशोभीकरण, भुयारी गटार या योजनांसाठी आम्हीच निधी आणला हे राठोड यांना माहिती नाही का? सीना नदी सुशोभीकरणास राठोड यांनी विरोध केला. त्यांच्या सर्मथकांच्या जागा या प्रकल्पात जात होत्या. त्यामुळेच त्यांनी हा प्रकल्प हाणून पाडला. उड्डाणपुलासाठी काढण्यात येणार्‍या अतिक्रमणास राठोड यांनीच विरोध केला. आम्ही तर पुलासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आमदार अरुण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.
सारसनगर भागात पाणीटंचाई आहे हे मान्य, परंतु सारसनगर हा माझ्या एकट्याचा परिसर नाही, राठोड यांचाही आहे. शहराचे आमदार या नात्याने त्यांनी येथील पाणीप्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आमदार राठोड म्हणतात आमची सारसनगर भागात दहशत आहे, परंतु खरी दहशत तर त्यांचीच आहे. त्या जोरावरच ते पाच वेळा निवडून आले. पूर्वी त्यांना पक्षात विरोध नव्हता, परंतु आता त्यांच्याच पक्षातील लोक विरोध करत आहेत. या मुद्दयावरून नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी ते आंदोलने व आरोप करत असल्याचे महापौर जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले.