आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण : शिवसेनेच्या वाटेला जाल तर याद राखा, राठोड यांचा विरोधकांना इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्यांनी भ्रष्टाचार करून पैसे कमवले नाहीत, अशांनीच शिवसेनेच्या विरोधात बोलावे. अनेकांची प्रकरणे बाहेर काढली, तर त्यांना शहरात राहता येणार नाही. शिवसेनेच्या वाटेला जाल, तर याद राखा, असा इशारा आमदार अनिल राठोड यांनी सोमवारी विरोधकांना दिला.

नेहरू मार्केटप्रश्नी शिवसेना, तसेच आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी व नेहरू मार्केटची वस्तुस्थिती मांडण्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत राठोड बोलत होते. नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत ही सभा झाली. यावेळी महापौर शीला शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, मनपा सभागृहनेते अशोक बडे, नगरसेवक नितीन जगताप, दिलीप सातपुते, अनिल बोरूडे, गणेश कवडे, अर्चना देवळालीकर, माजी नगरसेवक अनिल शिंदे, प्रकाश भागानगरे यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

नेहरू मार्केटचे भांडवल करून सेनेवर टीका करणार्‍यांचा समाचार घेताना राठोड म्हणाले, नेहरू मार्केट कृती समितीच्या माध्यमातून माझ्यावर टीका करण्याची शर्यत विरोधकांमध्ये सुरू होती. मुळात स्वत:चे गल्ले भरण्यासाठीच अचानक ही समिती स्थापन करण्यात आली. मग विरोधकही समितीच्या माध्यमातून चिवचिव करायला लागले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्यामराव, तुम्हाला इतर उपोषणे दिसत नाहीत का, असा टोला राठोड यांनी मारला. राजकारणात निवडून येत नाहीत, म्हणूनच विरोधक असे उद्योग करतात. सेनेने मात्र शहरातील गुंडगिरी थांबवण्याचे काम केले आहे. विरोधकांनी मात्र उपोषणाच्या नावावर भाजीविक्रेत्यांना दमदाटी करून त्यांना आपले व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पाडले. मात्र, शिवसेना भाजीविक्रेते व दुकानदारांच्या पाठीशी आहे. उपोषण करणारे दुसर्‍या दिवशीच झोपले, मग उपोषण होत नाही, तर करता कशाला असा टोला राठोड यांनी मारला. विरोधकांनी आपली सत्ता असताना गरज नसताना नेहरू मार्केट उद्ध्वस्त केले, तसेच पैसे कमवण्यासाठी व्यापारी संकुलाचा प्रीमियम 5 कोटी केला. सेनेने तो अडीच कोटी केला, परंतु ठेकेदार मिळत नाही, त्यात आमचा काय दोष असा सवाल राठोड यांनी केला.

विरोधकांची प्रकरणे बाहेर काढली, तर त्यांना शहरात राहता येणार नाही. त्यांनी सेनेच्या वाटेला जाऊ नये. आरोप करणार्‍यांचा समाचार त्याच पध्दतीने घेतला जाईल. पालकमंत्री बबनराव पाचपुते केवळ बैठका घेण्यात अग्रेसर आहेत. त्यांनी आतापर्यंत दुष्काळ, तसेच स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाबाबत अनेक बैठका घेतल्या, परंतु परिणाम काहीच झाला नाही. त्या बैठका कमी पडल्या म्हणून त्यांनी नेहरू मार्केटप्रश्नीदेखील बैठक घेतली, अशी टीका राठोड यांनी केली. आतापर्यंत सर्वांत जास्त विकासकामे सेनेने केली आहेत. त्यामुळे शहराला केवळ सेनाच न्याय देऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सेनेतून काढले असे जाहीर करा
राठोड सभेसाठी येत असताना हातगाडी व भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी त्यांना अडवत आमचे तुमच्याबाबतीत काहीच म्हणणे नाही, आम्हाला केवळ नेहरू मार्केट हवे आहे. आम्ही तुमचे स्वागतच करतो, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु राठोड यांनी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे शेवटी झिंजे म्हणाले, ‘‘मला सेनेतून काढले असे जाहीर करा.’’

वेळप्रसंगी वाईटपणा घेऊ..
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी दुपारी जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर व कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. नेहरू मार्केटचे काम पूर्ण करण्यासाठी वाईटपणा आला तरी चालेल, पण हे काम मार्गी लावायचे आहे, असे पाचपुते यावेळी म्हणाले.

आत्मपरीक्षण करावे
सभेत बोलताना आक्रमक झालेल्या महापौर शिंदे म्हणाल्या, आम्ही सर्वसामान्यांसाठी खुर्चीवर बसलो आहोत. विरोधकांसारखे राजकारण आम्हाला करायचे नसून केवळ समाजकारण करायचे आहे. त्यामुळे विरोधकांनी अगोदर स्वत:चे आत्मपरीक्षण करावे, मगच आमच्यावर टीका करावी.