आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री पिचड खरेच आदिवासी आहेत का? आमदार अनिल राठोड यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला केलेला विरोध चुकीचा आहे. मुळात पिचड हेच आदिवासी आहेत का, असा प्रश्न आमदार अनिल राठोड यांनी उपस्थित केला. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढरांसह मोर्चा नेला. त्यावेळी राठोड बोलत होते. कृती समितीचे पदाधिकारी निवृत्ती दातीर, दिगंबर ढवण, निशांत दातीर, राजेंद्र तागड, दशरथ पांढरे, विजय तमनर, अप्पा थोरात व ज्ञानेश्वर भास्कर, विठ्ठल दातीर आदी यावेळी उपस्थित होते.
राठोड म्हणाले, धनगर समाज ख-या अर्थाने आदिवासी आहे. आरक्षणाबाबत नऊ-नऊ तास बैठक होते. मात्र, त्यात तोडगा निघत नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर धनगर समाजाला निश्चित आरक्षण देण्यात येईल. आरक्षणासाठी लढावे लागणार आहे. जोपर्यंत समाज रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत सरकारचे डोके ठिकाणावर येणार नाही. सरकार गेंड्याच्या कातड्याचे आहे. उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घेता येत नसेल, तर त्यांनी खुर्ची रिकामी करावी. आरक्षण दिले नाही, तर संपूर्ण समाज पेटून उठेल. जोपर्यंत आरक्षण जाहीर करत नाही, तोपर्यंत एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोर्चानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन देण्यात आले. राज्यात 1 कोटीपेक्षा जास्त धनगर समाज आहे. भारत सरकारने 1956 व 1976 मध्ये महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर ऐवजी धनगड असे नमूद करून अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर समाजाला दिले. केंद्र सरकारकडून धनगरऐवजी धनगड अशा भाषिक अनुवादातून झालेल्या चुकीचा त्याच वेळी अभ्यास करून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे महाराष्ट्रात धनगडऐवजी धनगर जमात आहे, अशी शिफारस करणे गरजेचे असताना ते केले गेले नाही. राज्य शासनाला ही चूक कळली आहे. मात्र, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी व वसंत पुरके यांच्यासारख्या बालिश नेत्यांच्या हट्टापायी धनगर समाजाला सवलतीपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या मोर्चाला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी पाठिंबा दिला. मोर्चानंतर कोतवाली पोलिसांनी 70 आंदोलकांना गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
मोर्चात मेंढरांचाही समावेश
मेंढरांसह आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवला.भरपावसात पदाधिका-यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाला विरोध करणारे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचा निषेध केला. पोलिस बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पिचड हे बोगस आदिवासी
मधुकर पिचड आदिवासी समाजाचे नेते म्हणून राज्यभर मिरवतात. वास्तविक तेच बोगस आदिवासी आहेत. त्यांच्या जातपडताळणीची पुनर्पडताळणी करून जनतेसमोर सत्य सादर करावे. धनगर समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका; अन्यथा सर्वच आदिवासी नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’’ दिगंबर ढवण, पदाधिकारी, राज्य धनगर समाज आरक्षण कृती समिती.