नगर- शहरात खून, दरोडे व चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.पोलिस मात्र केवळ रिक्षांवर कारवाई करतात. काही अधिकारी आचारसंहितेचा गैरफायदा घेत चक्क ब्रिटिशांप्रमाणे वागत आहेत. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर या अधिका-यांचा हिशेब चुकता करू, असा इशारा आमदार अनिल राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
आठ दिवसांपूर्वी विनायकनगर भागात रोडे दाम्पत्याचा खून झाला. या प्रकरणाचा तपास लागलेला नाही. काही अधिकारी आचारसंहितेचा गैरफायदा घेत नागरिकांना वेठीस धरत आहेत. वाहतूक शाखेचा पोलिस निरीक्षक बेतालपणे वागत आहे. महापालिकेत कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांनी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच बससेवेचा फार्स केला. आता बससेवा बंद झाल्याने नागरिक रिक्षाने प्रवास करत आहेत, परंतु पोलिस भररस्त्यात नागरिकांना रिक्षातून उतरवतात. आचारसंहिता असल्याने आम्हाला काही बोलता येत नाही. अधिका-यांचा नागरिकांना राज्यकर्त्यांपेक्षा चांगल्या मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत, परंतु शहरात सध्या उलट स्थिती आहे, अशी टीका राठोड यांनी केली.