वैजापूर - राज्यातील सत्ता गमावल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आरामदायी वातानुकूलित वाहने आणि हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून संघर्ष यात्रा काढली. या नेत्यांनी काँग्रेसच्या मागील ७० वर्षांच्या राजवटीत शेतकऱ्यांची केलेली आर्थिक पिळवणूक व लुटमारीचा हिशेब द्यावा, अशा परखड शब्दांत प्रहार संघटनेचे संस्थापक तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी नेत्यांच्या संघर्ष यात्रेचा समाचार घेतला.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ राज्य सरकारने द्यावा, या प्रमुख मागणीसाठी नागपुरात महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीदिनी शेतकरी, शेतमजूर, विधवा, सैनिक व दिव्यांग यांची सीएम टू पीएम यांच्या निवासस्थानावर आमदार कडू आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात काढलेली शेतकरी आसूड यात्रा मंगळवारी वैजापुरात आली होती. या वेळी जाहीर सभेत आमदार कडू बोलत होते. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, धनंजय धोर्डे आदींची या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. आमदार कडू म्हणाले, शेतकरी आणि दिव्यांग एक झाल्यास या देशातील सत्ता परिवर्तन होऊ शकते.
या देशात राज्यकर्त्यांनी ७० वर्षांपासून शेतकऱ्यांना किती लुटले याचा हिशेब दिला पाहिजे. शेतकऱ्याची आर्थिक लूटमार करणाऱ्या राज्यकर्त्यांवर शेतकऱ्यांनी बैलावर चालवतात तसा आसूड चालवत वठणीवर आणण्याचे काम केले पाहिजे. ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचे काम केल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे. फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलाच पाहिजे, या मागणीसाठी आम्ही रणरणत्या उन्हात शेतकरी आसूड मोर्चा काढला. काँग्रेस- राष्ट्रवादीमधील नेते हे सत्ता गेल्यानंतर शेतकरी आणि सत्ता होती तेव्हा व्यापाऱ्याच्या भूमिकेत, असा आरोप आमदार कडू यांनी केला.
काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी कर्जमाफीसाठी काढलेल्या वातानुकूलित संघर्ष यात्रेवर त्यांनी जोरदार टीका करत अजित पवार यांनी ऊठबशा मारून शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, असे ते म्हणाले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी आसूड यात्रेत वैजापुरात दिव्यांगांसाठी आक्रमकपणाने काम करणारे अपक्ष आमदार कडू यांचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केल्यामुळे त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
आमदार कडूंचे आकर्षण
शेतकरी आसूड यात्रा वैजापुरात दाखल झाल्यानंतर आमदार कडू यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. आमदार कडू यांचा जयघोष पाहून अस्वस्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रघुनाथ पाटील यांच्या नावाने घोषणा सुरू करताच कडू यांनी सर्वांना शांत राहण्याच्या सूचना दिल्यानंतर जयघोष बंद झाला. भाषण ऐकण्यासाठी अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभेस हजेरी लावली.