आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बंब यांचे वक्तव्य अतिरेकीपणाचे, पाणीवाटप धोरणालाही कडाडून विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; मराठवाड्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी नगर जिल्ह्यातील निळवंडे धरण कॅप्सूल बॉम्ब लावून उडवण्याची लेखी मागणी प्राधिकरणाकडे करून खळबळ उडवून दिली. या बेताल मागणीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्या असून जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप होत आहे. जायकवाडी धरण बांधताना सरकारने जाहीर केलेल्या धोरणात्मक भूमिकेचा अभ्यास करताच बंब यांनी अतिरेकीपणे ही मागणी केल्याचा आरोप जिल्ह्यातील पाणीप्रश्नावरील जाणकार नेत्यांनी केला आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणीप्रश्नावर नगर विरुद्ध मराठवाडा असा वाद पेटत आहे. जायकवाडी बांधताना सरकारने निवेदन प्रसिद्ध करून भूमिका जाहीर केली होती. २४ मे १९६५ च्या निवेदनात म्हटले होते, ही योजना आखताना राज्यात उपलब्ध गोदावरीच्या जलसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, हा विचार नजरेसमोर आहे. पैठणच्या वरच्या भागात अस्तित्वात असलेल्या भविष्यात शक्य असणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या योजनांसाठी लागणारा पाणी पुरवठा अबाधित राहील, याचीही काळजी घेतली आहे. दुसऱ्याच दिवशीच्या निवेदनात म्हटले होते, पैठणच्या वरील भागात हल्ली अस्तित्वात असलेल्या योजना भविष्यात बांधता येणे शक्य असलेल्या योजना या सर्वांसाठी लागणारे पाणी (११३.५ टीएमसी) राखून ठेवल्यानंतर जे पाणी पैठणपर्यंत उपलब्ध होते, तेवढ्याच पाण्याचा उपयोग या योजनेत करण्याचे ठरवले आहे. पैठणच्या योजनेमुळे वरच्या योजनांना बाधा येणार नाही.

तत्कालीन सरकारने मांडलेल्या धोरणाला आता छेद देण्याचा प्रकार मराठवाड्यातून सुरू आहे. आमदार बंब यांनी बेताल मागणी करून हा वाद वाढवण्याचा प्रयत्न केला. समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली नगर जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा प्रयत्नांना वेग आला आहे. त्याचेच प्रतिनिधीत्व बंब यांनी केले आहे.

दोन वर्षांपासून समन्यायी पाणीवाटपाचा मोठा फटका नगरला सहन करावा लागत आहे. यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा सामना करतानाही जिल्ह्यातील सिंचन धोक्यात आणले गेले. यातून खरीप हंगाम वाया गेला. आता समन्यायीच्या नावाखाली रब्बीचे आवर्तनही धोक्यात आले आहे.

आमदार बंब यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याचा सूर जिल्ह्यातून उमटत आहे. तत्कालीन सरकारने जाहीर केलेली भूमिका आताच्या सरकारच्या लक्षात आणून देण्याची गरजही प्रकर्षाने पुढे आली आहे; अन्यथा समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली झालेला नगर जिल्ह्यावरील अन्याय पुढे सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोदावरी खोऱ्यातील पाणीवाटपाचा सन २०३० पर्यंतच्या प्रस्तावित आराखड्यातही जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा डाव आखण्यात आला असून येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत जास्तीत-जास्त हरकती नोंदवून हा आराखडा बदलण्यास भाग पाडण्याची गरज आहे.

हे तर अन्यायी धोरण...
जायकवाडीधरण बांधताना नगर जिल्ह्याचा पाणीवापर गृहित धरण्यात आला होता. पर्जन्यछायेचा दुष्काळी प्रदेश गृहित धरून जिल्ह्यातील धरणे झाली आहेत. समन्यायीच्या नावाखाली अन्यायी पाणीवाटपाचे धोरण सरकारकडून अवलंबले आहे. आम्ही या विरोधात सर्वप्रथम याचिका दाखल केली आहे. न्यायालयीन लढा सुरू असून हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू. बंब यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करणेच सोईस्कर ठरेल.'' बाळासाहेबथोरात, आमदार,संगमनेर.

हक्क जाऊ देणार नाही
जिल्ह्यातील धरणसाठ्यांवर आमचा हक्क आहे. तो कोणत्याही परिस्थितीत कुणालाही हिरावून घेऊ देणार नाही. मराठवाड्याचा अधिकारच जिल्ह्यातील पाण्यावर नाही. त्यामुळे कोणत्याही धोरणानुसार पाणी खाली जाऊ देणार नाही. याची जाणीव ठेवूनच सरकारने पुढील भूमिका घ्यावी.'' भाऊसाहेबकांबळे, आमदार,श्रीरामपूर.

माणुसकीला काळिमा फासला
बंब यांनी धरणे उडवून देण्याची मागणी करून माणुसकीला काळिमा फासला. समन्यायी पाणीवाटप करताना नदीचे खोरे गृहीत धरण्यात आले. ते चुकीचे आहे.'' बाळासाहेबमुरकुटे, आमदार,नेवासे.
जिल्हा उजाड करण्याचा डाव
^नगरजिल्हा उजाड करण्याचा मराठवाड्यातील भाजप आमदारांचा डाव आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणातून नेवासे तालुक्यावर सर्वाधिक अन्याय होत आहे. या अन्यायाला विरोध करू.'' शंकररावगडाख, माजीआमदार, नेवासे.

अधिकार कोणी दिला ?
बंब यांना काहीही बोलण्याचा अधिकार कोणी दिला? अशांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. समन्यायी पाणीवाटपाचे धोरण चुकीचे असून न्यायालयीन लढा सुरू आहे. प्रस्तावित जलआराखड्यालाही हरकतींच्या माध्यमातून विरोध सुरू आहे.'' चंद्रशेखरघुले, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी.

अतिरेकी विचार नकोच
जगातीलपाण्याचा कोणताही प्रश्न अतिरेकी विचारातून सुटलेला नाही. त्यामुळे नगर मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न समन्वय, परस्पर सहमती चर्चेतूनच सोडवावा लागणार आहे. मुद्दे संपले की लोक गुद्द्यावर येतात. याच मानसिकतेतून बंब यांनी अतिरेकी विचार मांडलेला दिसतो.'' जयप्रकाशसंचेती, निवृत्तकार्य. अभियंता.
त्यांनी कधी निर्मिती केली आहे का...

प्रशांतबंब हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असून कसे वागावे, कसे बोलायला हवे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. उद्ध्वस्त करण्याची भूमिका मांडत असताना त्यांनी कधी निर्मितीचे कामे केले का, असा प्रश्न आम्हाला पडलाय. कारण जो घडवतो तो उद्ध्वस्त करण्याची भाषा करत नाही. अशी भाषा करणाऱ्या बंब यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे. जायकवाडीचा प्रश्न तुम्ही वैचारिक पातळीवर मांडा, त्यासाठी विधानसभा आहे.'' वैभवपिचड, आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस.