आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवगाव - ऐन दुष्काळात मुलाच्या लग्नावर कोट्यवधींचा खर्च करणारे राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोट्यवधीच्या खर्चाबाबत चांगले खडसावले असतानादेखील यातून धडा न घेता तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी दुष्काळाचे भांडवल करून लाखो रुपये जाहिरातबाजीवर खर्च केले आहेत.
कायम दुष्काळाच्या वणव्यात होरपळणार्या शेवगाव तालुक्याची यंदाही दुष्काळाने पाठ सोडलेली नाही. कमी पावसामुळे शेवगाव तालुक्यात दुष्काळाची गंभीर स्थिती झाली असून गावोगावी पिण्याचे पाणी, मजुरांना रोजगार, जनावरांच्या चार्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असताना तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार घुले यांनी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी दुष्काळी प्रश्नाचे भांडवल करून लोकप्रियतेसाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपये जाहिरातीवर खर्च केले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना शहरटाकळी व 24 गावांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा योजना पंधरा दिवसांहून थकीत वीजबिलामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरटाकळीसह 25 गावांतील सत्तर हजार लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली.
शहर टाकळी पाणीपुरवठा योजनेकडे केवळ पंधरा लाख रुपये थकल्याने महावितरण कंपनीने योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. योजनेचे ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीकडे पाच लाख रुपये जमा आहेत. तरीही राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे पाणीपट्टी वसूल न झाल्यामुळेच पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस योजनेचा पाणीपुरवठा बंद होता. पाणी पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून पाणी योजना सुरू करण्याची मागणी केली. महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागली. विद्यार्थ्यांना सायकलला ड्रम लावून पाण्यासाठी वणवण फिरावे लागले. ऐन उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची गरज असताना केवळ राजकारणामुळे दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ जनतेवर आली असताना या भागातील लोकप्रतिनिधी लाखो रुपये खर्च करून जाहिरातबाजी करत आहेत. तालुक्यात दुष्काळाचे सावट असताना जाहिरातीवर लाखो रुपये खर्च परवडतोच कसा, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. अन्य नेते दुष्काळात खर्चावर काटकसर करतात. मात्र, तालुक्यात सध्या दररोज जाहीर सत्कार समारंभ या कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.