आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आमदार असूनही नगरवर अन्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाराष्ट्र शासनाने राज्यातील १२३ टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीमध्ये नगर जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश आहे. पण टंचाईग्रस्तसाठीच्या सर्व निकषांना पात्र असतानाही नगर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाही. नगर तालुक्याचे नेतृत्व तीन आमदार करतात, तरीही नगर तालुक्याला शासन दरबारी न्याय मिळाला नाही.तीन आमदारांचा असणारा नगर तालुका टंचाईग्रस्त यादीत पोरका झाल्याने लोकप्रतिनिधींविरोधात तालुक्यातील सर्वसामान्यांत संतापाची लाट उसळली आहे.

पावसाळयाचे अडीच महिने उलटून गेले असतानाही नगर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरित तालुक्यांत पावसाची सरासरी अवघी ३०.४४ टक्के म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी रािहली आहे.राज्य शासनाने १२३ टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करताना ज्या तालुक्यात जून ते आॅगस्टदरम्यान पावसाची सरासारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे, त्यांचा समावेश टंचाईग्रस्तांमध्ये केला आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता यांचा समावेश टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत आहे. पण नगर तालुक्याची जून ते आॅगस्टदरम्यानची सरासरी अवघी २८.०४ टक्के असतानाही नगर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाही.

नगर तालुक्यातील खातगाव टाकळी, निमगाव घाणा परिसर वगळता इतर तालुक्यात खरिपाच्या पेरण्याही झालेल्या नाहीत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा होतो आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कृिषपंपाच्या चालू वीजबिलात ३३ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ, शेतसारा माफ यासह मिळणाऱ्या इतर अनेक सवलतींपासून नगर तालुका वंचित राहणार आहे.

नगर तालुक्यातील गावे राहुरी, श्रीगोंदे व पारनेर या तीन विधानसभा मतदारसंघात विभागली गेली आहेत. आमदार शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते व विजय औटी हे तीन आमदार नगर तालुक्याला लाभलेले असतानाही नगर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत झालेला नाही. पण राहुरी, श्रीगोंदे व पारनेर यांचा समावेश टंचाईग्रस्त यादीत आहे. त्यामुळे तीन आमदार असूनही नगर तालुका अनाथ असल्याची भावना जनतेमध्ये दिसत असून लोकप्रतिनिधींविषयी संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

दुष्काळाच्या सावटाखाली वाटचाल करणाऱ्या नगर तालुक्याची सुरुवात अशी असेल, तर पुढील अवस्था कशी असेल, अशी चिंता आता सर्वसामान्यांना लागली आहे.

जून ते आॅगस्टदरम्यान पावसाची टक्केवारी :
अकोले -९३.१९ मिलिमीटर, संगमनेर - १९.३७ मिमी, कोपरगाव - २४.९९ मिमी, श्रीरामपूर - ३४.६९ मिमी, राहुरी - २६.७३ मिमी, नेवासे -२२.३४ मिमी, राहाता - २५.६७ मिमी, नगर - २८.०४ मिमी, शेवगाव - २७.८९ मिमी, पाथर्डी - ३१.९५ मिमी, पारनेर -१०.७६ मिमी, कर्जत -२४.५५ मिमी, श्रीगोंदे -१९.७४ मिमी, जामखेड - ३१.४५ मिमी.
मते मागणारे नेते टाळतात जबाबदारी...
नगर तालुका टंचाईग्रस्तचे सर्व निकष पूर्ण करत असताना प्रशासनाने तालुक्यावर अन्याय का केला? लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघाचा समावेश केला, पण नगर तालुक्याच्या जोडलेल्या गावांकडे कोणी लक्ष दिले नाही. या गावांची जबाबदारी त्यांची नाही का? याबाबत आमच्या भागाचे आमदार विजय औटी यांना फोन केला असता मी अजून यादीच पाहिली नाही. पाहतो, मग पुढे पाहू काय करायचे ते असे म्हणाले. नगर तालुक्यातील जनता मतदानासाठी चालते, मग जनतेची जबाबदारी घेण्याचे हे लोक टाळतात. नगर तालुक्यातील गावांकडे इतके दुर्लक्ष का? जर नगर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत झाला नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल.”
परसराम तडके, शेतकरी, खडकी, ता. नगर.