आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार कर्डिले यांना एक वर्षाची सक्तमजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मतदान केंद्रात प्रवेश घुसून गोंधळ घातल्याप्रकरणी दोषी ठरवून आमदार शिवाजी कर्डिले यांना जिल्हा न्यायालयाने 1 वर्ष सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याच खटल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ झिने यांना 6 महिने सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने लगेचच दोघांनाही वैयक्तिक जामिनावर मुक्त केले. बारा वर्षांपूर्वी (मे 2002) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान हा प्रकार झाला होता.
नगर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर 25 मे 2002 ला मतदान प्रक्रिया सुरू होती. तेथे मतदान करण्यासाठी सरस्वती पालवे आल्या होत्या. त्या बोगस मतदार असल्याचे समजून झिने यांनी पालवे यांच्या जवळची मतपत्रिका हिसकावली. त्याचवेळी आमदार कर्डिलेही मतदान कक्षात आले. त्यांनी गोंधळ करीत शिवीगाळ व दमदाटी करून मतदान प्रक्रिया बंद पाडली. याप्रकरणी मतदार केंद्र अधिकारी पुरुषोत्तम क्षीरसागर यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली.
त्यानुसार झिने व आमदार कर्डिलेंविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात चालली. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सरस्वती पालवेंसह 3 साक्षीदार फितूर घोषित करण्यात आले. आरोपींतर्फे राजकीय आकसापोटी आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पण, खटल्यातील इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी झिने व आमदार कर्डिले यांना शिक्षा सुनावली. त्यानंतर प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर दोघानाही मुक्त करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सचिन सूर्यवंशी यांनी काम पाहिले.