आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार मोनिका राजळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - श्री क्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून निधी आणू, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

भगवानगड येथील भगवानबाबांच्या समाधीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ६ जानेवारीला मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आमदार राजळे आल्या होत्या. नगरसेविका मंगल कोकाटे, जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ खेडकर, संजय बडे, महादेव जायभाये, काशीताई गोल्हार, ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यावेळी उपस्थित होते.

गडावरील वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला असून रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर गस्त वाढवली आहे. महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या सेवाभावी पद्धतीने अहोरात्र झटत आहेत. दैनंदिन सेवाकार्य, श्रमदान व नियोजनासाठी परिसरातील २५ गावांतील लोक तैनात आहेत. आणखी दहा गावांना निमंत्रित करण्यात आले असून सांगतेच्या दिवशी आवश्यकता भासल्यास आणखी पाच गावे सेवाकार्यासाठी बोलावू, असे महंतांनी सांिगतले. सायंकाळी हरीपाठानंतर मंदिर प्रदक्षिणा करण्यासाठी हजारो भाविक लोटांगण घालत, भजने, अभंग, टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन फुगड्यांचा फेर धरतात. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

गडाच्या दर्शनी भागात सध्या वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे. ती अपुरी पडत असल्याने सोमवारपासून ही व्यवस्था गडाच्या पायथ्याशी करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. आमदार राजळे यांनी महंतांची भेट घेऊन सप्ताहाबाबत माहिती घेतली. राजळे म्हणाल्या, या सप्ताहामुळे राज्याच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशात भर पडली आहे. भगवानगडामुळे तालुक्याचे नाव देशात पोहोचत आहे. शासनासह अन्य यंत्रणांच्या विकासयोजना गडापर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करू.