आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: महापालिकेत शिवसेनेचा हुकूमशाही कारभार, आमदार संग्राम जगताप यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेत सत्ताधारी शिवसेना हुकूमशाही पध्दतीने काम करत आहे. केवळ श्रेयासाठी या रस्त्याचे काम नऊ महिने प्रलंबित ठेवण्यात आले, असा आरोप आमदार जगताप यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांना जशाच तसे उत्तर देण्यास राष्ट्रवादी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ चौक, चांदणी चौक, तसेच अहमदनगर महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता या तिन्ही रस्त्यांच्या कामासाठी विशेष बाब म्हणून निधी मिळावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी डिसेंबर २०१६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भात महापालिकेने ठराव मंजूर करून पाठवावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले होते. महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो महासभेसमोर ठेवण्यासाठी महापौर कार्यालयाकडे पाठवला. परंतु सहा महिने उलटूनही महापौर सुरेखा कदम यांनी हा प्रस्ताव महासभेच्या अजेंड्यावर घेतला नाही. या रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करून पाठवावा, अशी दोन पत्रे जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही प्रस्ताव मंजूर केला नाही. सत्ताधाऱ्यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळे तिन्ही रस्त्यांची कामे रखडली. 
 
मनपातील सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महापालिकेतील शिवसेनेची हुकूमशाही खपवून घेणार नाही, त्यांना जशाच तसे उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचे यावेळी जगताप यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्त्यांचे काम कधी सुरू होईल, असे लेखी पत्र द्या, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असे जगताप म्हणाले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली. अखेर लेखी पत्र मिळाल्यानंतर आमदार जगताप यांनी आंदोलन मागे घेतले. 
 
यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कुमार वाकळे, गटनेते संपत बारस्कर, विपुल शेटिया, अरिफ शेख, संजय घुले, अविनाश घुले, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेश्मा आठरे, अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते. 
 
जनता माफ करणार नाही 
शिवसेनेचे नेते पदाधिकाऱ्यांकडून मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना दादागिरीची भाषा वापरली जात आहे. चुकीची नियमबाह्य कामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. मात्र, सत्ताधाऱ्यांची दादागिरीची भाषा यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल. जनतादेखील आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाही. 
- संग्राम जगताप, आमदार. 
 
कामांना लवकरच सुरूवात 
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या महासभेत या रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. हे काम मोठ्या रकमेचे आहे. निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच निधी प्राप्त होणार असून या रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.  
- सुरेखा कदम, महापौर. 
बातम्या आणखी आहेत...