आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे राजकारण संपवण्याची सुपारी;आमदार गडाखांचा विरोधकांवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी भांडत असल्यामुळे उत्तरेतील पुढार्‍यांनी नेवाशातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून माझी राजकीय कारकीर्द संपवण्याची सुपारी दिली आहे. परंतु न घाबरता नेवाशाच्या हक्कासाठी लढा देणार आहे, असा निर्धार आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व नेवासे येथील मध्यमेश्वर बंधारा पूर्ण भरला. या बंधार्‍याच्या पाण्याचे पूजन गडाख यांच्या हस्ते झाले. या वेळी नेवासे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, निळवंडे धरण पूर्ण झाल्यावर र्शीरामपूर व नेवासे तालुक्याचे वाळवंट होणार आहे. यापुढे निळवंडेच्या पाण्यामधून प्रवरेवरील 14 बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव ठेवणे आवश्यक आहे. नेवासे तालुक्याला जायकवाडीतील हक्काचे तीन टक्के पाणी मिळावे. यासाठी लढा द्यावा लागेल. सर्व बंधारे भरण्यासाठी केवळ दीड टीएमसी पाणी लागते. यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र, हक्काच्या पाण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून भावी काळात लढे उभारावे लागणार आहेत. र्शीरामपूर तालुक्यातून यासाठी साथ मिळत नसल्याची खंत गडाख यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील व उत्तरेतील पुढारी यांचा नेहमीच पाणीप्रश्नासंदर्भातील बैठकांमध्ये दबाव असतो. प्रत्येक वेळी मी नेवासे तालुक्यातील बंधार्‍यासाठी भांडत असल्याने त्यांनी मला राजकीयदृष्ट्या संपवण्याची सुपारी दिली आहे. पण याला मी घाबरत नाही. सर्वांनी मतभेद व पक्षभेद विसरून एकत्रित लढा देण्याची गरज आहे. मी हक्काच्या पाण्यावर गदा येवू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

..तर विरोधकांचा सत्कार करू
निळवंडेच्या पाण्यातून बंधारे भरून देऊ, असे पत्र स्थानिक विरोधकांनी उत्तरेतील नेत्यांकडून आणल्यास आपण त्यांचा घरी जाऊन सत्कार करू. बैठकांमध्ये न्याय्य भूमिका घेणार्‍या सुनील तटकरे व अजित पवार यांचे उत्तरेमध्ये पुतळे जाळले जातात, याचा निषेध करतो, असे गडाख यांनी सांगितले.