नगर - राज्य सरकारच्या नियमानुसार अकरावीचे प्रवेश अर्ज नि:शुल्क देणे बंधनकारक आहे. सन 2003 मध्ये दिलेल्या या आदेशाला नगरमधील बहुतांश महाविद्यालयांकडून केराची टोपली दाखवली जाते. 50 रुपये घेऊन प्रवेशअर्ज व माहिती पुस्तिका विकल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकाराचा निषेध करत सोमवारी दुपारी अकरावीच्या प्रवेशअर्जांची होळी केली.
यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले, अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची लूट केली आहे. कारण नसताना विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाच्या विविध प्रकारच्या फंडांचा भार टाकण्यात येत आहे. मागील वर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात आंदोलन केले होते. गेल्या वर्षी अकरावीच्या प्रवेशअर्जांसाठी सत्तर ते ऐंशी रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आंदोलनानंतर काही प्रमाणात का होईना, विद्यार्थ्यांची लूट थांबली होती. तथापि, यंदा पुन्हा पन्नास रुपये शुल्क आकारून अकरावीच्या प्रवेशअर्जांची विक्री केली जात आहे.
महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलत नाही. आम्ही प्रवेशअर्ज व माहितीपत्रके आधीच छापून ठेवली आहेत, असा युक्तिवाद काही महाविद्यालये करत आहेत. परंतु हा खोटारडेपणा आहे. शासनाचा आदेश 2003 मध्येच आला असताना महाविद्यालयांनी माहिती पुस्तके व प्रवेशअर्ज त्यापूर्वीच छापून ठेवले होते का, असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला.
अकरावीच्या प्रवेशअर्जासाठी शहरातील विविध महाविद्यालयात पन्नास रुपये शुल्क आकारले जात असल्याची चित्रफीतही मनविसेने काढली आहे.
तर हेल्पलाइन सुरू करा...
४सोमवारी आम्ही शहरातील प्रत्येक महाविद्यालयात जाऊन इयत्ता अकरावीच्या प्रवेश अर्जांची होळी केली. महाविद्यालयाची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मनमानी शुल्क आकारण्यापेक्षा हेल्पलाइन सुरू करावी. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून आर्थिक रक्कम उकळण्याचा प्रकार सर्व शिक्षण संस्थाचालकांनी थांबवावा, अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे.’’
- सुमित वर्मा, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.
छायाचित्र - ‘मनविसे’च्या वतीने सोमवारी न्यू आर्टस महाविद्यालयासमोर प्रवेशअर्जांची होळी करण्यात आली.