आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन्यथा शिर्डी संस्थान ‘तिरुपती’कडे द्या, राज ठाकरेंची सरकारवर उपरोधिक टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - ‘देश-विदेशातून रोज लाखो साईभक्त शिर्डीला येत असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करावा. तसेच विकासासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून द्यावा. हे जर राज्य सरकारला जमत नसेल तर साईबाब संस्थान तिरुपती देवस्थानच्या हवाली करावे,’ अशी उपरोधिक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी राज्य सरकारवर केली.
राज ठाकरे आपल्या मुलांसह हेलिकॉप्टरने रविवारी साई दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर पंधरा मिनिटे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘शिर्डीला लाखो साईभक्त येत असतात, त्यामुळे शिर्डीचा विकास नगरपंचायत किंवा साई संस्थान एकट्याने करू शकणार नाही. शिर्डीचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करून त्याच्या माध्यमातून स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही राज यांनी केली.
मात्र, राज्य सरकारला विकास करायचा नसेल तर शिर्डी संस्थान तिरूपती देवस्थानच्या स्वाधीन करावे, अशी उपरोधीक टीकाही त्यांनी केली. यंदा नाशिकला कुंभमेळा आहे, तेथील विकासाची जबाबदारी फक्त महापालिकेची नाही त्यामुळे राज्य केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. आतापर्यंत फक्त निधी देण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप पैसा आलेला नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
देवस्थानचा पैसा विकासासाठी वापरा
देशभरातीलदेवस्थानांकडे असलेले सोने राष्ट्रीयीकृत बँकांत ठेवण्याचे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाबाबत बोलताना राज म्हणाले, पंतप्रधानांच्या आवाहनाचे आपण स्वागत करतो. मात्र, देवस्थानकडे असलेल्या सोने पैशाचा उपयोग देवस्थान परिसराच्या विकासासाठी करावा. उर्वरित पैसा देशहितासाठी वापरता यावा, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
एमअायएमवर माैन
निवडणुकांतमोठमोठ्या घोषणा करून जनतेची सहानुभूती मिळवण्याऱ्या मोदी सरकारच्या काळात विकासकामे सुरू झाल्याचे चित्रही बघायला मिळत नाही. त्यामुळे अच्छे दिन येतील की नाही यावर लोकांचा भरवसा राहिलेला नाही, अशी टीकाही राज यांनी पंतप्रधान माेदींवर केली. राज्यातील सरकारच्या कामगिरीविषयी बोलण्याचे टाळत योग्यवेळी याबाबत बोलू असे ते म्हणाले. तसेच एमआयएमने मारलेल्या मुसंडीबाबतही योग्य वेळी भाष्य करू असे सांगितले.

फोटो - राज ठाकरे यांनी रविवारी शिर्डीत येऊन श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
बातम्या आणखी आहेत...