आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेकडून अमराठी पाट्यांची शिर्डीमध्ये तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - साईनगरी शिर्डीत दुकानांवर लावण्यात आलेल्या अमराठी पाट्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर नगर जिल्हाप्रमुख विजय काळे, शहराध्यक्ष दाणू कोते, नाना बावके यांच्यासह 8 जणांना अटक केली. नंतर न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

शिर्डीतील बहुसंख्य दुकाने व हॉटेल्सच्या पाट्या दाक्षिणात्य भाषेत आहेत. जोड म्हणून हिंदी व इंग्रजीत नावे आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी या फलकांना आक्षेप घेतला. जिल्हाप्रमुख काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अमराठी पाट्यांची तोडफोड सुरू केली. नगर-मनमाड रस्त्यावरील 70 ते 80 दुकानांचे, हॉटेलचे फलक तोडण्यात आले. एकच गोंधळ उडून साईभक्तांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार सुरू असताना सुरुवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच त्यांनी तोडफोड करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक केली.

विविध राज्यांतून साईभक्त येतात, तेव्हा यात गैर काय : शिवसेना

शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे विविध राज्यांमधून साईभक्त येथे येतात. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या भाषेत फलक लावणे गरजेचे आहे. अशा प्रकारे फलक तोडून दहशत निर्माण करणे चुकीचे आहे. दक्षिण भारतातून येणार्‍या भक्तांना फक्त त्यांचीच तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम भाषा समजते. त्यामुळे त्यांच्या भाषेत फलक लावण्यात गैर काहीच नाही. प्रत्येक प्रांतातील भाषेत फलक लावण्यासाठी पोलिस आणि नगर पंचायतीने बैठक घ्यावी. शिवसेना त्यांना सर्मथन देईल, असे शिवसेनेचे राहता तालुकाप्रमुख कमलाकर कोते यांनी स्पष्ट केले.